Kolhapur: ग्रोबझ प्रकरणी तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख बलकवडे यांना हजर राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:45 IST2025-12-20T11:44:44+5:302025-12-20T11:45:06+5:30
सर्किट बेंचमध्ये सुनावणी

Kolhapur: ग्रोबझ प्रकरणी तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख बलकवडे यांना हजर राहण्याचे आदेश
कोल्हापूर : ग्रोबज कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूकप्रकरणी शुक्रवारच्या सुनावणीत तत्कालीन तपास अधिकारी आणि त्यावेळचे जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांच्यासह इतर तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.
न्यायालयाची परवानगी घेऊन पंडित हे सुनावणीला ‘व्हीसी’वरून दाखल झाले होते. यावेळी न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनाही सोमवार (दि. २२) पर्यंत तपासाचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात स्वतः हजर राहून सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
जादा परताव्याचे आमिष दाखवून कोल्हापूरसह शेजारच्या जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना ग्रोबझ कंपनीच्या संचालकांनी कोट्यवधीचा गंडा घातला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग केला होता. कंपनीचा मुख्य संचालक विश्वास कोळी याच्या जामीन अर्जावर सर्किट बेंचमध्ये सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात विसंगती असल्याचे फिर्यादीच्या वकिलांनी सुनावणीत निदर्शनास आणून दिले. तपासात विसंगती असल्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गंभीर दखल घेतली आहे. म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीत तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख पंडित यांच्यासह इतर तपास अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. सुनावणीस गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती.