गौरीच्या मुखवट्यावरील ७ तोळे दागिन्यांवर डल्ला, अंधाराचा फायदा घेत चोरटे झाले पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 13:08 IST2022-09-05T13:08:17+5:302022-09-05T13:08:44+5:30
चोरट्यांचा पाठलाग करण्यात आला, पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले

गौरीच्या मुखवट्यावरील ७ तोळे दागिन्यांवर डल्ला, अंधाराचा फायदा घेत चोरटे झाले पसार
देवाळे : माले (ता. पन्हाळा) येथील अरुण आनंदा चौगुले यांच्या घरी गौरीच्या मुखवट्यावर घातलेले सात तोळे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला. चोरट्यांचा पाठलाग करण्यात आला, पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अरुण चौगुले यांचे घर जिल्हा परिषद मराठी शाळा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहे. गौरी-गणपतीचा सण असल्याने चौगुले यांनी परंपरेप्रमाणे आपल्या घरातील सोन्याचे दागिने गौरीच्या मुखवट्यावर घातले होते. मात्र, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराचा पाठीमागचा दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून दरवजा उघडून घरात प्रवेश केला आणि गौरीच्या मुखवट्यावरील अंदाजे सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. दोन तिजोरीतील अन्य वस्तू मिळतील या हेतूने चोरट्यांनी तिजोरीकडे मोर्चा वळवला परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही.
दरम्यान अरुण चौगुले कामावरून परत आला असता घराचे दार उघडण्यासाठी घरातील लोकांना फोन केला. फोनचा आवाज ऐकून अज्ञात दोन चोरट्यानी धूम ठोकत असताना अरुण व त्याच्या आईने आरडाओरडा केला. अरुणने चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.
चोरीचा तपास करण्यासाठी घटनास्थळी ठसे तज्ञ व स्टेला नावाच्या श्वानासह पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी श्वान घरा सभोवती घुटमळत राहिले. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करत आहेत.