अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याला राज्य सरकारने विरोध करावा, आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:32 IST2024-12-19T13:31:11+5:302024-12-19T13:32:26+5:30
कोपार्डे : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील गावे पाण्याखाली जाणार आहेत. महापुरास कारणीभूत असणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी ...

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याला राज्य सरकारने विरोध करावा, आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी
कोपार्डे : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील गावे पाण्याखाली जाणार आहेत. महापुरास कारणीभूत असणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक शासनाबरोबर बोलणे करावे, अशी मागणी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी नागपूर अधिवेशनात केली.
नरके म्हणाले, कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात कारवाई चालू केलेली आहे. सध्या ५१९.६० मीटर प्रकल्पाची पूर्ण संचित पातळी आहे. अलमट्टीची उंची वाढवून त्याची संचित पातळी ५२४ मीटर करण्याचे नियोजन कर्नाटक शासनाने सुरू केले आहे. जर अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा पावसाळ्यात महापुरामुळे जलमय होऊन शेती, नागरी वस्ती, पिके व गावे उद्ध्वस्त होतील. ५१९ मीटर पाणी पातळीवर कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती भयानक होते. उंची ५२४ मीटरवर गेली तर कोल्हापूर जिल्हा जलमय होणार आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जमिनींचे हस्तांतरण करण्याचे काम कर्नाटक सरकारने चालू केले आहे.
महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल. त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तातडीने कार्यवाही करावी. केंद्र सरकारने यामध्ये वाटाघाटी करून अलमट्टीची उंची वाढवण्याचे काम व जमिनीचे हस्तांतरण चालू आहे त्याला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली.