Kolhapur: नेतृत्व योग्य नसल्यानेच ‘हमीदवाडा’, ‘भोगावती’, ‘कुंभी’ची स्थिती बिकट; अजित पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 19:08 IST2025-05-24T19:06:30+5:302025-05-24T19:08:10+5:30
राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील राज्यातील संस्था आदर्शवत

Kolhapur: नेतृत्व योग्य नसल्यानेच ‘हमीदवाडा’, ‘भोगावती’, ‘कुंभी’ची स्थिती बिकट; अजित पवार यांची टीका
गारगोटी : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील ‘केडीसीसी’, ‘गोकुळ’, कोल्हापूर बाजार समिती या संस्थांचा कारभार आदर्शवत आहे. के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘बिद्री’ साखर कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांत आहे. नेतृत्व योग्य असले की संस्था बळकट होतात, चुकीच्या नेतृत्वामुळे संस्था रसातळाला जातात. ‘बिद्री’च्या कार्यक्षेत्रातील ‘भोगावती’, ‘हमीदवाडा’, ‘कुंभी’, ‘गडहिंग्लज’, ‘आजरा’ या कारखान्यांची अवस्था बिकट आहे. आठ-नऊ महिने कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, हे फार चांगले नसल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
मुदाळ (ता. भुदरगड) येथे माजी आमदार के. पी. पाटील यांनी जाहीर सभेत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला. त्या सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील सहकारी सूतगिरण्या अडचणीत आल्या असताना ‘हुतात्मा’ सूतगिरणी आर्थिकदृष्टया सक्षम आहे. ‘गोकुळ’ दूध संघाने तर २० लाख लिटरचा टप्पा गाठला आहे. राज्यातील आदर्शवत सहकारी संघ आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेतृत्वाखाली उत्तमप्रकारे संस्था चालवल्या जातात.
कितीही मशाली पेटवा; हदयात ‘राष्ट्रवादी’च
के. पी. पाटील यांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हातात घड्याळ आणि हदयात राष्ट्रवादी असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
‘के. पी.’-‘ए. वाय.’ वादाचे ऑपरेशन करू
के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यामुळेच हसन मुश्रीफ जिल्ह्याचा नेता झाला. याची जाणीव मला असून, त्यांच्यातील वाद मिटवणारच. ‘के. पी.’नी कितीही विरोध केला तरी मी आग्रह सोडणार नाही. दोघांमधील वादाच्या मुद्याचे ऑपरेशन करू, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.