Kolhapur Crime: फुलेवाडी खुनाचा घटनाक्रम आला समोर, नेमकं काय घडलं.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:18 IST2025-09-15T12:17:40+5:302025-09-15T12:18:28+5:30
चौघांना अटक, इतरांचा शोध सुरू, आणखी काही नावे निष्पन्न

Kolhapur Crime: फुलेवाडी खुनाचा घटनाक्रम आला समोर, नेमकं काय घडलं.. वाचा
कोल्हापूर : फुलेवाडी येथील गंगाई लॉनमागे शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्री झालेल्या महेश राख याच्या खुनाची कारणे पोलिसांच्या तपासात समोर येत आहेत. पत्नीला पळवून नेल्याने आदित्य गवळी याचा महेशवर राग होताच. तसेच, शुक्रवारी सायंकाळी फुलेवाडीतील चौकातच महेशने आदित्यच्या गळ्याला एडका लावून त्याला मारण्याची धमकी दिली होती. या घटनेने वाद पेटून गवळी टोळीने महेशला संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सराईत गुन्हेगार महेश राख हा हद्दपारीची मुदत संपताच शुक्रवारी (दि. १२) फुलेवाडीत आला होता. सायंकाळी सातच्या सुमारास त्याने चौकात आदित्य गवळी याच्या गळ्याला एडका लावून मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर संतापलेल्या गवळी टोळीने रात्री साडेदहाच्या सुमारास महेशचा मित्र विश्वजीत फाले याच्या घरात घुसून तोडफोड केली.
त्यानंतर दुसरा मित्र ओंकार शिंदे याच्याही घरावर बिअरच्या बाटल्या आणि दगडफेक करून दहशत माजवली. तिथेच महेश राख याला बोलवून घेऊन त्याचा गेम केला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. आदित्य गवळी याच्या पत्नीला पळवून नेल्यानंतर गवळी टोळीने महेशसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत असे ठरवले होते. मात्र, तोच काही कुरापती करून उचकवत होता, अशी माहिती अटकेतील हल्लेखोरांनी पोलिसांना दिली.
१५ ते १७ जणांकडून हल्ला
महेश राख याच्यावर हल्ला करण्यात १५ ते १७ जणांचा सहभाग होता. यापैकी सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून, इतर हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. यातून सोहम शेळके याचे नाव निष्पन्न झाले. आणखी काही हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. लवकरच त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौघांना अटक
महेश याचा खून करून पळालेल्या हल्लेखोरांपैकी तिघांना पोलिसांनी रविवारी (दि. १४) अटक केली. सोहम संजय शेळके (वय २२, रा. गजानन महाराज नगर, कोल्हापूर) आणि मयूर दयानंद कांबळे (२२, रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वारे वसाहत येथून ताब्यात घेतले. तर, पियूष पाटील (रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर) व बालाजी गोविंद देऊलकर (२४, रा. पाचगाव) याला करवीर पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपींना सोमवारी (दि. १५) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
महेश राखकडून हद्दपारीचा भंग
महेश राख याला पोलिसांनी वर्षभरासाठी हद्दपार केले होते, तरीही तो गणेशोत्सवात घरी आला होता. जुना राजवाडा पोलिसांनी त्याला २८ ऑगस्टला ताब्यात घेऊन हद्दपारी भंगाची नोटीस दिली होती. त्यापूर्वीही त्याचा फुलेवाडी परिसरात वावर होता, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.