मैत्रीची दोरी तुटली, तर 'ते' त्यांचे दुर्दैव; महापालिकेच्या जागा वाटपासह, सतेज पाटलांबाबत मंत्री मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:40 IST2025-12-19T14:34:02+5:302025-12-19T14:40:44+5:30
..नाहीतर काय करायचे हे आता कशाला सांगू

मैत्रीची दोरी तुटली, तर 'ते' त्यांचे दुर्दैव; महापालिकेच्या जागा वाटपासह, सतेज पाटलांबाबत मंत्री मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं
कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेतील जागावाटपा संदर्भाचा फॉर्मुला अजून ठरलेला नाही फॉर्मुला ठरल्यानंतर नक्की कळवू. २५ पेक्षा अधिक जागा मिळायला पाहिजेत, नाही तर काय करायचे हे आता कशाला सांगू अशी गुगली मंत्री हसन मुश्रीफ यांनी टाकली. तसेच सतेज पाटील यांना विरोधी पक्ष नेते पद मिळत नाही हे त्यांचं दुर्दैव असल्याचे म्हणत आता आमच्या मैत्रीची दोरी तुटली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्टच सांगितले.
महायुतीतील नेतेमंडळीच्या बैठकीनंतर महापालिकेच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यानच, मंत्री हसन मुश्रीफ आज, कोल्हापुरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नगरपालिका निवडणुकीच्या निकालासह, मनपा जागावाटप तसेच सतेज पाटील यांच्या मैत्रीवर भाष्य केले.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात महायुतीमध्ये ४० प्रत्येकी जागा शिवसेना-भाजपने घ्याव्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली वीस ते पंचवीस वर्षे महापालिकेच्या सत्तेत आहे. आज आमच्याकडे डझनभर माजी महापौर, उपमहापौर असल्याचे सांगितले, तर, इचलकरंजी महापालिकेबाबत गुरुवारी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा झाली आहे. संभाव्य उमेदवारांची लिस्ट जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी माजी आमदार हाळवणकरांना दिली आहे, मी स्वतःही आवाडेंना लिस्ट दिली असल्याचे सांगितले.
सतेज पाटील यांच्यासोबतची मैत्रीची दोरी तुटली
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबात बोलताना मुश्रीफ म्हणाले, प्रज्ञा सातव यांची पाच वर्ष आमदारकी शिल्लक आहे. तरीसुद्धा त्या राजीनामा देऊन भाजपमध्ये जात आहेत. या प्रकरणावरून काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही असे म्हणत, विरोधी पक्ष नेत्याचा नंबर कमी करण्यासाठी त्या जात आहेत हे मी वाचलं, आता सतेज पाटील यांना विरोधी पक्ष नेते पद मिळत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे असा खोचक टोलाही लगावला. तसेच आता आमच्या मैत्रीची दोरी तुटली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्टच सांगितले.
नगरपालिकेत जिल्ह्यात राष्ट्रवादी नंबर वन
तर, २१ जानेवारीला नगरपालिका मतमोजणी होणार आहे. नगरपालिकेत कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी एक नंबर असेल असाही दावाही त्यांनी यावेळी केला.