सावर्डे पाटणकर येथे काळम्मावाडी धरणाचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 19:23 IST2022-05-06T19:22:24+5:302022-05-06T19:23:21+5:30
सोळांकूर : काळम्मावाडी धरणाच्या उजवा कालव्याला राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील मोरेंचा नाळवा या शेत हद्दीतील कालव्याला भगदाड पडल्याने ...

सावर्डे पाटणकर येथे काळम्मावाडी धरणाचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया
सोळांकूर : काळम्मावाडी धरणाच्या उजवा कालव्याला राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील मोरेंचा नाळवा या शेत हद्दीतील कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. सुमारे पाच तास पाणी वाहत होते.
या दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागणार असल्याने कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतीस याचा फटका बसणार आहे. याघटनेनंतर पुन्हा एकदा कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चर्चा रंगली. ही घटना घडून देखील याठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही.
धरणातून डाव्या व उजव्या कालव्यात सन १९९९ पासून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले होते. कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याची बाब कालवे ग्रस्त संघर्ष समिती व भुमिपुत्रांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिली होती. मात्र, तरी देखील यावर कोणतीही उपाययोजना झाली नाही.
कालव्यात ठिकठिकाणी छोटे मोठी भगदाड पडली आहेत. ती केवळ दगडांच्या साहाय्याने मुजवली आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी योग्य ती उपाययोजना करून सततच्या कालवा फुटी व गळती थांबवावी अशी मागणी स्थानिक भुमीपुञांनी केली आहे.