Marathon: कोल्हापूरकर उद्या धावणार.. 'लोकमत महामॅरेथॉन'चे नववे पर्व गाजवणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:51 IST2025-11-15T13:51:10+5:302025-11-15T13:51:51+5:30
लाखांची बक्षिसे, धावपटूंची उत्सुकता पोहोचली शिगेला

संग्रहित छाया
कोल्हापूर : प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या लोकमतकोल्हापूर महामॅरेथॉनच्या नवव्या पर्वाचा प्रत्यक्ष थरार उद्या रविवारी (दि. १६) पोलिस परेड मैदानावर सकाळी ६ वाजल्यापासून रंगणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूसह सर्वच स्तरांतील नागरिक, अधिकारी व्यावसायिक धावपटूंसह सर्वजण सहभागी होण्यासाठी आतूर आहेत. त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्यासह परराज्यांतील व्यावसायिक धावपटूंनी नावनोंदणी करीत या महामॅरेथॉनला विशेष पसंती दिली आहे. बीब एक्पोचे उदघाटन आज शनिवारी होत आहे.
कोल्हापुरात कसबा बावडा पोलिस परेड मैदानातून रविवारी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी या महामॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. सर्वच गटातील स्पर्धकांनी त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. क्रीडा संघटना, ग्रुप, महिला मंडळ, क्लब, असोसिएशन, संस्था, उद्योग, कारखाने आणि विद्यार्थ्यांनी नोंदणीला प्राधान्य दिले आहे. अनेकांनी मित्रमंडळींसह सहकुटुंब महामॅरेथॉनचे बुकिंग केले आहे. बहुतांश फॅमिली रन करणारे ३ आणि ५ किलोमीटर शर्यतीत धावणार आहेत. वैयक्तिक धावणारे हौशी व व्यावसायिक धावपटू १० किलोमीटरच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत. या सर्वांचा एक अनोखा मेळाच पोलिस परेड मैदानावर रंगणार आहे.
लोकमत महामॅरेथॉनचा मार्ग असा
- ३ किलोमीटर : पोलिस ग्राउंड-धैर्यप्रसाद चौक- सर्किट हाऊस-पुन्हा धैर्यप्रसाद चौक-पितळी गणपती-डीएसपी चौक- पोलिस ग्राउंड (डावी आणि उजवी बाजू)
- ५ किलोमीटर : - पोलिस ग्राउंड-धैर्यप्रसाद चौक-महासैनिक दरबार हॉल-पुन्हा धैर्यप्रसाद चौक-पितळी गणपती मार्गे- डीएसपी चौक-पोलिस ग्राउंड (डावी आणि उजवी बाजू)
- १० किलोमीटर : - पोलीस ग्राउंड, धैर्यप्रसाद चौक-महासैनिक दरबार हॉल-पुन्हा धैर्यप्रसाद चौक-कावळा नाका-उड्डाण पूल, कावळा नाका, पितळी गणपती मार्गे-डीएसपी चौक-पोलीस ग्राउंड (कावळा नाका ते धैर्यप्रसाद चौक डावी बाजू)
लोकमत महामॅरेथॉन सुटण्याच्या वेळा / उपस्थित राहण्याची वेळ
- १० किलोमीटर : सकाळी ६:३० वाजता / सकाळी ६ वाजता
- ५ किलोमीटर : ६:४५ वाजता / सकाळी ६ वाजता
- ३ किलोमीटर : ६:५५ वाजता / सकाळी ६ वाजता
लाखांची बक्षिसे
मॅरेथॉनमध्ये १० किलोमीटरमधील विजेत्यांना वयोगटनिहाय मिळून रुपयांची बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत, तर ३, ५ किलोमीटरमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. महामॅरेथॉन झाल्यानंतर तिथेच थोड्याच वेळात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.