खरा राजकीय भूकंप सामान्य जनताच करणार - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 13:01 IST2023-07-03T13:00:43+5:302023-07-03T13:01:04+5:30
जनता उघड्या डोळ्यांनी हा खेळ पाहत आहे

खरा राजकीय भूकंप सामान्य जनताच करणार - राजू शेट्टी
कोल्हापूर : सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे मतदान कार्ड विकणे आहे, निवडणूक आयोगाने शाई ऐवजी चुना लावावा अशा जनतेतून प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, जनतेला मला एक सांगायचे आहे. वादळासोबत पालापाचोळा उडून जातो; पण ज्याची मूळ जमिनीत घट्ट रुतलेली असतात, तो वाऱ्याला दाद देत नाही. जनता उघड्या डोळ्यांनी हा खेळ पाहत आहे. खरा राजकीय भूकंप कशाला म्हणतात हे सामान्य जनता २०२४ लाच दाखवेल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी व्यक्त केले.
ते म्हणाले, महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरलेला आहे, असे आम्ही नेहमी म्हणायचो; पण आज ज्या पद्धतीने शपथविधी झाला, एकूण राजकीय घटना घडल्या. त्या बघता माझ्यासारख्याला नव्हे तर सामान्य लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी मतदार ओळखपत्र जाळून टाकू या, अशा प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचा सर्वच राजकीय नेत्यांनी विचार करावा. ग्रामपंचायत व नगरपालिकेत दलबदलूपणा बघून संताप यायचा; पण आता ते बरे म्हणायची पाळी राज्यकर्त्यांनी आणली आहे.