Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेची जय्यत तयारी, येणार आता पदाधिकारी; सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण
By समीर देशपांडे | Updated: January 15, 2026 20:04 IST2026-01-15T19:38:58+5:302026-01-15T20:04:03+5:30
याआधीच्या सभागृहातील त्रुटींकडे वेळोवेळी सदस्यांनी लक्ष वेधल्यानंतर त्यानुसार सुधारणा या नवीन कामात करण्यात आल्या

Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेची जय्यत तयारी, येणार आता पदाधिकारी; सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण
समीर देशपांडे
कोल्हापूर : पुढच्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार असल्याने प्रशासनानेही जय्यत तयारी सुरू केली आहे. राजर्षी शाहू सभागृहाचे नूतनीकरण झाले असून आता पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची आणि दालनांची किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आधीच्या सभागृहाची मुदत १९ मार्च २०२२ ला संपल्यानंतर काही कालावधी झाल्यानंतर शाहू सभागृहाचे नूतनीकरण सुरू करण्यात आले. यामध्ये आतील सर्व रचना बदलण्यात आली असून व्यासपीठासमोर चढत्या क्रमाने काँक्रीट टाकून त्यावर खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या सदस्यालाही व्यासपीठावरील व्यक्ती दिसणार असून व्यासपीठावरूनही शेवटच्या रांगेतील सदस्य दिसू शकणार आहे. या ठिकाणी आकर्षक परंतु साधी प्रकाशयोजना करण्यात आली असून संपूर्ण नवीन ध्वनी यंत्रणा बसविण्यात आली आहे.
याआधीच्या सभागृहातील त्रुटींकडे वेळोवेळी सदस्यांनी लक्ष वेधल्यानंतर त्यानुसार सुधारणा या नवीन कामात करण्यात आल्या आहेत. मात्र, यामुळे आता आसन क्षमता मर्यादित झाल्या असून ती अधिकाधिक १०० पर्यंत मर्यादित राहणार आहे. दीड कोटी रुपयांमध्ये हे संपूर्ण नूतनीकरण आणि आधुनिक ध्वनी व्यवस्था करण्यात आली आहे.
नागाळा पार्कातच नागोबा मंदिरासमोर जिल्हा परिषदेला लागूनच उपाध्यक्षांसह चार सभापतींची निवासस्थाने आहेत. गेली पावणे चार वर्षे ही निवासस्थाने धूळखात पडून होती. त्यामुळे आता येथील स्वच्छता, किरकोळ दुरुस्ती आणि रंगकाम करण्यात येणार आहे. नागाळा पार्कातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर अध्यक्षांचे निवासस्थान आहे. या ठिकाणीही किरकोळ दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. तर दालने आणि निवासस्थाने दुरुस्ती, रंगरंगोटीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून प्रत्येक ३५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
बांधकाम सभापतीही तळमजल्यावर
जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावर सध्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, समाजकल्याण, महिला आणि बालकल्याण आणि शिक्षण सभापतींची दालने आहेत. परंतु, बांधकाम समिती सभापतींचे दालन हे दुसऱ्या मजल्यावर बांधकाम विभागाच्या दालनासमोरच होते. परंतु, तळमजल्यावरील प्राथमिक शिक्षण विभाग चौथ्या मजल्यावर स्थलांतरित झाल्यामुळे आता या ठिकाणी बांधकाम समिती सभापतींचे दालन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र सुमारे २५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.
फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे महिन्याभरात पदाधिकारी निवासस्थाने आणि दालने याचे नूतनीकरण करण्यात येईल. छ. शाहू सभागृहाचे नूतनीकरण काम झाले आहे. - मानसिंग पाटील, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग