Chandrakant Patil: राष्ट्रवादीचे पुरोगामित्व केवळ सांगण्यापुरते, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 11:04 IST2022-04-22T11:03:30+5:302022-04-22T11:04:03+5:30
समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करीत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करीत आहेत.

Chandrakant Patil: राष्ट्रवादीचे पुरोगामित्व केवळ सांगण्यापुरते, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे या पक्षाचे पुरोगामित्व केवळ सांगण्यापुरते असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली आहे.
समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करीत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करीत आहेत. ही राष्ट्रवादी काँग्रेसची टुकडे टुकडे गँग पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आवरावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पाटील म्हणाले की, हिंदू समाजातील पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुस्लिम अथवा अन्य धर्मीयांच्या धर्मगुरूंची टिंगल करायची हिंमत होत नाही, हे आश्चर्यकारक आहे. मिटकरी पुरोहितांची टिंगल करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मंत्री धनंजय मुंडे हे जोरात हसून चिथावणी देत होते. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला एखाद्या समाज घटकाला असे लक्ष्य करणे शोभत नाही.
सोशल मीडियावर टीकेचे लक्ष्य
पुरोहितांच्या टिंगलप्रकरणी मिटकरी, जयंत पाटील आणि मुंडे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत असल्याचे पाहावयास मिळाले. अनेक व्हॉटसॲप ग्रुपवरून मिटकरी यांचे फोटो टाकून निषेधांचे संदेश पाठविले जात आहेत. तसेच पाटील, मुंडे यांनी जाहीरपणे अशा चेष्टेला पाठबळ दिल्याने त्यांचाही निषेध होत आहे.