कोल्हापूर पोलिस दलातील ताफ्यात नवीन २८ वाहनांची भर पडणार; ४० वाहने कालबाह्य होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 18:56 IST2025-04-30T18:55:43+5:302025-04-30T18:56:20+5:30

थारसह बॉम्ब शोधक व नाशक व्हॅनचा समावेश, महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान

The police force received 28 new vehicles from the funds of Rs 2 crore 80 lakhs approved by the Kolhapur District Planning Committee | कोल्हापूर पोलिस दलातील ताफ्यात नवीन २८ वाहनांची भर पडणार; ४० वाहने कालबाह्य होणार

कोल्हापूर पोलिस दलातील ताफ्यात नवीन २८ वाहनांची भर पडणार; ४० वाहने कालबाह्य होणार

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या २ कोटी ८० लाखांच्या निधीतूनपोलिस दलास नवीन २८ वाहने मिळाली आहेत. यात एका थारसह २३ बोलेरो, दोन मोठ्या बस, एक बॉम्ब शोधक व नाशक व्हॅन आणि एका एक्सयूव्ही वाहनाचा समावेश आहे. बुधवारी महाराष्ट्रदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू स्टेडियम येथील समारंभात पोलिस दलास वाहने प्रदान करण्यात येणार आहेत.

जिल्हा पोलिस दलाकडील अनेक वाहने कालबाह्य होत असल्याने त्यांना नवीन वाहनांची गरज होती. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीने २०२३-२४ मधील खर्चातून पोलिसांच्या वाहनांसाठी २ कोटी ८० लाखांच्या निधीची तरतूद केली होती. यातून एक थार, २३ बोलेरो, दोन मोठ्या व्हॅन, बॉम्ब शोधक व नाशक व्हॅन आणि एक एक्सयूव्ही वाहन खरेदी करण्यात आले आहे.

खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून, पालकमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी पोलिस दलास नवीन वाहने प्रदान केली जाणार आहेत. गेल्यावर्षी जिल्हा नियोजनातून पोलिसांच्या वाहनांसाठी ३ कोटी ६० लाखांचा निधी मिळाला होता. त्यातून १६ दुचाकी आणि २६ चारचाकी, अशी एकूण ४२ वाहने खरेदी केली होती, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.

४० वाहने कालबाह्य होणार

जिल्हा पोलिस दलाकडे सध्या ४४६ वाहने आहेत. यातील ४० वाहनांची मुदत संपत असल्याने लवकरच ते कालबाह्य होणार आहेत. त्यामुळे नव्याने वाहनांची खरेदी करावी लागणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या २०२४-२५ च्या खर्चात तरतूद करण्याची विनंती केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांच्या मोटार वाहन विभागाचे अधिकारी सूरजसिंग राजपूत यांनी दिली.

Web Title: The police force received 28 new vehicles from the funds of Rs 2 crore 80 lakhs approved by the Kolhapur District Planning Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.