Kolhapur: स्मशानभूमीत अघोरी पूजा करणारा मांत्रिक शिरोलीचाच; मांत्रिक फरार, शोधण्यासाठी पोलिस पथक तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:12 IST2025-11-01T12:10:35+5:302025-11-01T12:12:37+5:30
प्रसार माध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्यावर जिल्हा पोलिस प्रमुख योगेश गुप्ता यांनी स्वतः यात लक्ष घालून पोलिसांचा एक पथक तयार करून गावात संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पाठवले

Kolhapur: स्मशानभूमीत अघोरी पूजा करणारा मांत्रिक शिरोलीचाच; मांत्रिक फरार, शोधण्यासाठी पोलिस पथक तैनात
शिरोली : शिरोली गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी अशी पूजा करणारा मांत्रिक शिरोली गावातील किशोर लोहार हाच असून त्याच्यासह इतर साथीदारांवर महाराष्ट्र जादूटोणा आणि अघोरी प्रथा कायदा २०१३ अंतर्गत अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माजी राज्य युवा सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गिरीश फोंडे यांनी लेखी पत्राद्वारे शिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शिरोली गावातील स्मशानभूमीत अघोरी पूजा करून बाटलीत आत्मा बंद केला असून, दोन दिवसांत त्याचे रिझल्ट मिळतील’ असे मांत्रिक किशोर लोहार बोलत होता. अघोरी कृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली.
वाचा: बाटलीत आत्मा बंद केलाय, दोन दिवसात काम मार्गी लागेल, कोल्हापुरातील शिरोलीत स्मशानभूमीत अघोरी पूजा-video
मध्यरात्री काही अनोळखी लोकांनी स्मशानभूमीत तंबू ठोकून तंत्र–मंत्र सुरू केले. त्यांनी हातात लिंबू घेऊन मंत्रोच्चार केले, तीन ठिकाणी बसून जप केला आणि काही नावे घेत अघोरी पूजा केली. या दरम्यान बाटलीत काहीतरी टाकून आत्मा बंद केल्याचे दृश्यही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रसार माध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्यावर जिल्हा पोलिस प्रमुख योगेश गुप्ता यांनी स्वतः यात लक्ष घालून पोलिसांचा एक पथक तयार करून गावात संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पाठवले होते हे पथक दुपारी एक वाजता शिरोली गावात येऊन गेले. स्मशानभूमी येथे पाहणे केली तसेच संबंधित मंत्री कशा घरीसुद्धा जाऊन आले; पण मांत्रिक जागेवर नव्हता फरार झालेला तसेच शिरोली पोलिसांनी सुद्धा गावातून त्याची चौकशी करून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो फरार होता. याबाबत शिरोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी मांत्रिक किशोर लोहार याला शोधण्यासाठी पथक तैनात केले असल्याचे सांगितले.