कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनाचा मार्ग प्रशस्त होणार; सुधारित ५९५ कोटींच्या आराखड्यात प्रस्तावित
By भीमगोंड देसाई | Updated: March 16, 2026 12:39 IST2026-03-16T12:39:06+5:302026-03-16T12:39:31+5:30
महाद्वारचे १९ मीटर, जोतिबा रोडचे ९ मीटर रुंदीकरण; एक हजारपेक्षा अधिक चारचाकीचे वाहनतळ

कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनाचा मार्ग प्रशस्त होणार; सुधारित ५९५ कोटींच्या आराखड्यात प्रस्तावित
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराच्या सुधारित ५९५ कोटी १५ लाख २३ हजार रुपयांच्या आराखड्यात राजाराम, जोतिबा रोडचे नऊ मीटर आणि महाद्वार रोडचे १९ मीटर रुंदीकरणासह चौफेर विकास करण्यात येणार आहे. परिसरातील रस्ते, दर्शन मंडप, सुसज्ज पार्किंग तळ, दर्जेदार मूलभूत सुविधा, दुकाने, पोलिस स्टेशन इमारत यासाठी एकूण १० लाख ९५ हजार ६४ स्क्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच सुधारित मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मंदिराच्या संरक्षक भिंतीपासून १० मीटर परिघाचे भूसंपादन होणार आहे. दरम्यान, आराखड्यात भाविक, पर्यटकांना अधिकाधिक सेवा, सुविधा देणे, वाहनतळ निर्माण करणे, स्थानिकांना त्याच परिसरात व्यवसायासाठी जागा देण्याचे नियोजन केले आहे.
वाचा: गुढीपाडव्याला ३५१ भरा, अंबाबाईला साडी अर्पण करा; भाविकांना फसवण्याचा ऑनलाईन फंडा
या आराखड्यावर आणखी खुलेपणाने सविस्तर चर्चा होणार आहे. चर्चेेत स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सामावून घेण्यात येणार आहे. संबंधित सर्व घटकांना विश्वासात घेऊन विकासकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाचे आहे.
प्रस्तावित मंदिर परिसरात सेवा
- सुविधांचे प्रस्तावित बांधकाम क्षेत्र स्क्वेअर फुटात असे..
- राजाराम रोडकडील विभाग : ८ लाख ९६ हजार ४३२
- लँडस्केप प्लाझा : २ लाख ६७ हजार २७१
- महाद्वार रोडकडील विभाग : १ लाख २६ हजार ३६८
- दर्शन मंडप : ५८ हजार ९८३
- स्वच्छतागृह : ९८२
- पोलिस स्टेशन : ३२२
- जुनी मंदिरे : ११८४
- बैठक व्यवस्था : १० हजार ७८९
- रस्ते रुंदीकरण : ८१ हजार ४४७
- नव्याने रस्ते : १४ हजार ७७०
कोणत्या कामावर किती तरतूद ?
- नव्याने बांधकाम, फर्निचर : ४५३ कोटी ६६ लाख
- संवर्धन : ९ कोटी ४३ लाख
- पाणीपुरवठा, सांडपाणी निर्गत : ४१ कोटी ८० लाख
- इलेक्ट्रीफिकेशन, फायर फिटींग : ९० कोटी २४ लाख
एक हजारपेक्षा अधिक चारचाकीचे वाहनतळ
राजाराम रोडकडील वाहनतळ तळमजल्यावर तीन टप्पे, तळमजला, पहिला मजला असे होणार आहे. येथे १०१८ चारचाकी आणि ९७६ दुचाकीच्या पार्किंगची सुविधा होणार आहे. महाद्वार रोडकडे दोन मोठे शॉपिंग प्लाझा होणार आहेत. यामध्येही दुचाकी पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे. मंदिर परिसरातील महादेव मंदिराजवळ व्हीआयपी वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. बिंदू चौकातील आताच्या वाहनतळाजवळ सबजेल आहे. त्याचे स्थलांतर झाल्यानंतर तेथील हेरिटेल इमारती कायम राखून भव्य असे वाहनतळ उभारण्यात येणार आहे.
बिंदू चौकाजवळ व्यवसायासाठीच्या सेवा, सुविधा...
बिंदू चौकाजवळ ४४ हजार ३७५ स्क्वेअर मीटरचे क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. यातील २४ हजार ६५२ स्क्वेअर मीटरचे बांधकाम करण्यात येणार आहे.
परिसर विकसित झाल्यानंतर रहिवासी, व्यावसायिक क्षेत्र वाढणार..
महाद्वार रोड, सरलष्कर भवन, राजाराम रोडवर सध्या १ लाख ९५ हजार २१७ स्क्वेअर फूट इतके रहिवास क्षेत्र आहे. विकसित केल्यानंतर यामध्ये ४८ हजार ८०४ चौरस फुटाचे क्षेत्र वाढणार आहे. याच परिसरात आता व्यावसायिक क्षेत्र १ लाख २७ हजार चौरस फूट आहे. विकसित केल्यानंतर यामध्ये ३१ हजार ७५१ चौरस फुटांनी वाढणार आहे.