शिवभोजन थाळीवाले पाच महिन्यांपासून उपाशी, कोल्हापूर जिल्ह्यात किती केंद्रे, थकीत अनुदान किती.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:01 IST2025-10-08T18:59:54+5:302025-10-08T19:01:18+5:30
दिवाळीआधीच दिवाळे

संग्रहित छाया
कोल्हापूर : गरिबांचे पोट भरणारे शिवभोजन थाळी केंद्रचालकच गेल्या पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने उपाशी राहिले आहेत. तोंडावर दिवाळीचा सण असताना केंद्रचालकांचे आधीच दिवाळे निघाले आहे. जिल्ह्यात एकूण ५३ केंद्रे असून महिन्याला ६० लाख रुपये याप्रमाणे ३ कोटींचे अनुदान प्रलंबित आहे.
गोरगरीब अगदी रस्त्यावर राहणाऱ्या माणसानेही उपाशीपोटी राहू नये यासाठी शासनाने शिवभोजन थाळी केंद्र सुरू केले. आतापर्यंत ही केंद्रे व्यवस्थित चालवली जात होती. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र अन्य योजनांप्रमाणे या योजनेसाठीही रक्कम कमी पडू लागली आहे. त्यामुळे केंद्रचालकांचे सहा महिन्यांचे अनुदान थकीत होते. त्यापैकी फक्त एक महिन्याची रक्कम काही दिवसांपूर्वी देण्यात आली.
गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन थाळीवरील अनुदानच न मिळाल्याने राज्यभरातील १८०० पेक्षा अधिक शिवभोजन थाळी योजना केंद्रचालकांनी ठिकठिकाणी उपोषण करीत निदर्शने केली. यानंतर त्यांना २०० कोटींची थकबाकी देण्याचा निर्णय झाला; पण प्रत्यक्षात केवळ २१ कोटींवरच बोळवण करण्यात आली. जिल्ह्यातील केंद्र चालकांचे एप्रिलपासूनचे अनुदान थकीत होते त्यापैकी फक्त एप्रिल महिन्याचे अनुदान काही दिवसांपूर्वी देण्यात आले.
जिल्ह्यात ५३ केंद्रांत ६१०० थाळ्या
जिल्ह्यात एकूण ५३ शिवभोजन थाळी केंद्रे असून त्यात सर्वाधिक संख्या करवीर म्हणजे शहरात आहे. या ५३ केंद्रांमधून रोज ६१०० थाळ्या दिल्या जातात. या थाळीत १० रुपयांत जेवण दिले जाते.
महिन्याला ६० लाख रुपये
शहरातील केंद्रचालकांना थाळीमागे ४० रुपये, तर ग्रामीण भागातील केंद्र चालकांना ३५ रुपये अनुदान दिले जाते. जिल्ह्यासाठी दर महिन्याला ६० लाख रुपये अनुदान लागते.
गेल्या पाच महिन्यांपासून थाळीचे अनुदान मिळालेले नाही. दिवाळीचा सण तोंडावर आहे. किराणा दुकानदारांकडे उधारी करून तरी किती करायची. पुन्हा साहित्य न्यायला त्यांच्या दारात जायचे म्हणजे नको वाटते. शासनाने ही अडचण ओळखून लवकरात लवकर अनुदान द्यावे. - शिवभोजन केंद्रचालक