कोल्हापूरकरांनो सावधान!, कोरोना पुन्हा परतला, सक्रिय रुग्णसंख्या आठ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:14 IST2025-06-03T12:13:51+5:302025-06-03T12:14:23+5:30

सीपीआरमध्ये स्वतंत्र विभाग, केंद्रासह राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना

The number of corona patients in Kolhapur district has reached eight | कोल्हापूरकरांनो सावधान!, कोरोना पुन्हा परतला, सक्रिय रुग्णसंख्या आठ 

कोल्हापूरकरांनो सावधान!, कोरोना पुन्हा परतला, सक्रिय रुग्णसंख्या आठ 

कोल्हापूर : जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या आठवर पोहोचली असून, केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्य शासनानेही महापालिका आणि जिल्हा परिषद तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांना सोमवारी पत्रे पाठवून दक्षता आणि सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनीही दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात १४ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील एका महिलेचा मृत्यू झाला असून, पाच जणांची तब्येत ठणठणीत झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सीपीआरमध्ये दाखल वृद्धेचा रविवारी मृत्यू झाला. आता एकही रुग्ण सीपीआरमध्ये दाखल नसून उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहेत तर काही घरी उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे.

सहव्याधी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये

हाताची, श्वसन स्वच्छता, खोकण्याचे शिष्टाचार यासारख्या स्वच्छतापूर्ण वर्तनाचे समुदायाने पालन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जाणीव जागृती करण्याचे उपक्रम हाती घ्यावेत. सहव्याधी असणाऱ्या नागरिकांनी किंवा रोगप्रतिकारशक्तीची कमतरता असलेल्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे राज्य शासनाच्या सोमवारच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

ऑक्सिजनची तयारी ठेवा

महापालिका, जिल्हा परिषदांच्या आणि शासनाच्या रुग्णालयांचा आढावा घेण्याच्याही सूचना करण्यात आल्या असून, ऑक्सिजनची सुविधाही सज्ज आहे का? याचीही पाहणी करण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यक औषधे, आयसोलेशन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडची तयारी ठेवण्याबाबतही अधोरेखित करण्यात आले आहे.

कोरोना लागण स्थिती
१४ मे : ०१
३१ मे : १४
मृत्यू : ०१
डिस्चार्ज : ०५
सर्व रुग्ण खासगी रुग्णालयात..

मास्क बाहेर काढा..

हा तीव्र स्वरूपाचा कोरोना नसला तरी आधीच व्याधीग्रस्त असलेल्या नागरिकांना याची लागण लवकर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांना जुन्या व्याधी आहेत, त्यांनी बाहेर फिरताना मास्क घालूनच बाहेर पडावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

सीपीआरमध्ये कोरोनावरील उपचारासाठी ३५ बेडचा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून, याठिकाणी कोरोना काळातील प्रक्रियेची सर्व तयारी करण्यात आली आहे. सोमवारी कोरोनाचा एकही रुग्ण सीपीआरमध्ये दाखल नाही. याठिकाणी व्हेंटिलेटरचीही सुविधा तयार ठेवण्यात आली आहे. - डॉ. एस. एस. माेरे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर

Web Title: The number of corona patients in Kolhapur district has reached eight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.