घराला लागलेली आग विझवायला गेल्यानंतर उघडकीस आला वृद्धाचा खून, कोल्हापुरातील पाचगाव रोडवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:30 IST2025-09-04T17:29:57+5:302025-09-04T17:30:11+5:30
रिक्षाचालकाचा खून करून हल्लेखोर पसार

घराला लागलेली आग विझवायला गेल्यानंतर उघडकीस आला वृद्धाचा खून, कोल्हापुरातील पाचगाव रोडवरील घटना
कोल्हापूर : येथील हनुमाननगर परिसरातील पाचगाव रोडवर घराला लागलेली आग विझविण्यासाठी गेलेल्या शेजा-यांना घरात रिक्षाचालक वृद्धाचा मृतदेह आढळला. मोहन नारायण पवार (वय ७२, रा. हनुमाननगर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. ४) सकाळी साडेअकराच्या सुमारास निदर्शनास आला.
हल्लेखोराने चाकूने गळा चिरून पवार यांचा खून केला असावा. तसेच देव्हा-यावरील समईने बेडवरील गादीला आग लावून पळ काढला असावा, असा प्राथमिक अंदाज जुना राजवाडा पोलिसांनी वर्तवला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन पवार आणि त्यांचा मुलगा पुष्कराज (वय २५) हे दोघेच पाचगाव रोड येथील घरात राहत होते. मोहन हे रिक्षा चालवत होते, तर त्यांचा मुलगा शहरातील एका महाविद्यालयात नोकरी करतो. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास मुलगा कॉलेजवर गेला. सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातून धुराचे लोट उसळल्यानंतर शेजा-यांनी पुष्कराज याला फोन करून घरात आग लागल्याची माहिती दिली. तसेच अग्निशामक दलास वर्दी दिली.
दरम्यानच्या काळात शेजा-यांनी स्वयंपाक घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता बेडवर मोहन पवार हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले. काही वेळातच दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली.
माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाने हल्लेखोराचा माग काढण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिकच्या पथकानेही घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.