कोल्हापुरातील आयजी ऑफिस पुण्याला हलविण्याचा पुन्हा घाट, महानिरीक्षकांचे विभागीय आयुक्तांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 15:55 IST2024-12-14T15:55:29+5:302024-12-14T15:55:46+5:30

कोल्हापुरातील गुन्हे घटल्याचा अजब तर्क

The move to shift the IG office from Kolhapur to Pune, Letter from Inspector General to Divisional Commissioner | कोल्हापुरातील आयजी ऑफिस पुण्याला हलविण्याचा पुन्हा घाट, महानिरीक्षकांचे विभागीय आयुक्तांना पत्र

कोल्हापुरातील आयजी ऑफिस पुण्याला हलविण्याचा पुन्हा घाट, महानिरीक्षकांचे विभागीय आयुक्तांना पत्र

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण विभागाचे मुख्यालय असलेले कोल्हापुरातील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय पुण्यात हलविण्याचा पुन्हा घाट घातला जात आहे. खुद्द आयजी सुनील फुलारी यांनीच कार्यालय स्थलांतरित करण्याचे मागणीपत्र पोलिस महासंचालक आणि विभागीय आयुक्तांना पाठवले आहे. विशेष म्हणजे काही लोकप्रतिनिधींनी याला पाठबळ दिल्याने कोल्हापूरचे आयजी ऑफिस पुण्याला स्थलांतरित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

फुलारी यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे विभागातील सर्व शासकीय कार्यालये पुण्यात आहेत. मात्र, विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र कार्यालय कोल्हापुरात आहे. त्यामुळे चार जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात तसेच इतर महत्त्वाच्या बैठकांसाठी कोल्हापूरला जावे लागते. पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण येथे मोठे बंदोबस्त, व्हीव्हीआयपी दौरे असतात. सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी पुणे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय प्रशासकीयदृष्ट्या पुण्यात स्थलांतरित करणे गरजेचे आहे.

कोल्हापूरसह सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. भविष्यात या ठिकाणी पोलिस आयुक्त कार्यालय मंजूर झाल्यास मनुष्यबळ वाढू शकते, असा अजब तर्क लावून कोल्हापूरचे कार्यालय पुण्याला हलविण्याची परवानगी मागितली आहे. आयजी फुलारी यांनी १० डिसेंबरला विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून कार्यालय स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. मात्र, कोल्हापूरकरांनी नेहमीच या मागणीला विरोध केला आहे. आयजी ऑफिस कोल्हापुरातच राहावे, यासाठी जनआंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थन

पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कोल्हापूरचे आयजी ऑफिस पुण्याला हलविण्याची विनंती केली. तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राम सातपुते आणि आमदार राहुल कुल यांनीही आयजी ऑफिस पुण्याला हलविण्याची मागणी केली होती.

कोल्हापुरातील गुन्हेगारी नियंत्रणात

कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण येथे सद्य:स्थितीत सीमावाद व मोठे प्रश्न नाहीत. पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या दोन जिल्ह्यांत वर्षभरातील गुन्ह्यांची संख्या परिक्षेत्रातील एकूण गुन्ह्यांच्या ५० टक्के इतकी आहे; तर कोल्हापूरसह इतर तीन जिल्ह्यांतील गुन्ह्यांची संख्या ५० टक्के आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या सर्वांत कमी आहे. गुन्हेगारीही नियंत्रणात असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

कोल्हापुरातील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय पुण्यात हलवण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत. हा सरकार बदलल्याचा परिणाम आहे. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या, व्यापारीदृष्ट्या असलेले महत्त्व, कर्नाटक, गोवा यांची सीमा पाहता हे कार्यालय कोल्हापुरात असणे आवश्यक आहे. - आ. सतेज पाटील, विधान परिषद गटनेते, काँग्रेस

Web Title: The move to shift the IG office from Kolhapur to Pune, Letter from Inspector General to Divisional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.