मंत्री छगन भुजबळांविरोधात मराठा समाज कोल्हापुरात उद्या तक्रार देणार
By संदीप आडनाईक | Updated: November 19, 2023 19:15 IST2023-11-19T19:14:48+5:302023-11-19T19:15:01+5:30
कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी ११ वाजता दसरा चौकातील मंडपात तासभर धरणे आंदोलन करण्यात आले.

मंत्री छगन भुजबळांविरोधात मराठा समाज कोल्हापुरात उद्या तक्रार देणार
कोल्हापूर: दंगा घडवून आणण्यासाठी बेछूटपणे चिथावणी दिल्याबद्दल अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या, सोमवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात देण्यात येणार आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी ११ वाजता दसरा चौकातील मंडपात तासभर धरणे आंदोलन करण्यात आले.
आरक्षणाचा प्रश्नामुळे मराठा समाजाच्या भावना प्रक्षुब्ध असताना राज्यात दंगली माजविण्याच्या उद्देशाने मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाबद्दल अंबड येथील सभेत प्रक्षोभक विधान केल्यामुळे मराठा समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे. यामुळे भुजबळांच्या विरोधात भा. द. वि. सं. कलम १५३, १५३ अ, ४९९, ५०४, ५०५ व २९५-ए अन्वये गुन्ह्यांची नोंद करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. सकाळी ११ वाजता दसरा चौकात ही बैठक झाली. उद्या, मंगळवारी सायंकाळी ५ वाजता लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात समाजाचे कार्यकर्ते भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. या बैठकीदरम्यान, ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, काका जाधव, राजू लिग्रंज, सुभाष जाधव, प्रसन्ना शिंदे, शैलजा भोसले, संयोगिता देसाई आदी उपस्थित होते.