कोल्हापुरात महायुतीमध्ये एकमत झालं, उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:24 IST2025-12-19T19:23:49+5:302025-12-19T19:24:41+5:30
महायुतीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापुरात महायुतीमध्ये एकमत झालं, उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्यावर तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचे एकमत झाले. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत अखेर आज, शुक्रवारी यावर शिक्कामोर्तब झाले. बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जयंत पाटील उपस्थित होते.
बैठकीत तिन्ही पक्षांची उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेच्या वतीने युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, भाजपच्या वतीने आमदार अमल महाडिक, प्रा.जयंत पाटील व प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष आदील फरास, महेश सांवत, संदीप कवाळे प्रमुख असणार आहेत. या उपसमितीची उद्या बैठक पार पडणार आहे.
ही उपसमिती प्रत्येक प्रभागातील महायुतीच्या इलेक्टीव्ह मेरीट असणाऱ्या उमेदवारांची चाचपणी करणार आहे. त्यानुसार किती जागांवर कोण लढणार याची प्राथमिक चर्चा केली जाणार आहे. त्यानुसार उपसमिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक या वरिष्ठ नेत्यांच्या समितीकडे अहवाल सादर करणार आहे. यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून अंतिम जागा वाटपावर निर्णय घेणार आहे.