Kolhapur: बाळूमामा देवस्थानने दीड कोटी मोजून खरेदी केलेली जमीन कागदोपत्री, प्रत्यक्षात जागा गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:27 IST2025-10-09T12:26:05+5:302025-10-09T12:27:43+5:30
जमीन पाहण्याचीही घेतली नाही तसदी, संशयास्पद व्यवहारावर सोयीस्कर डोळेझाक

Kolhapur: बाळूमामा देवस्थानने दीड कोटी मोजून खरेदी केलेली जमीन कागदोपत्री, प्रत्यक्षात जागा गायब
शिवाजी सावंत
गारगोटी : आदमापूर (ता.भुदरगड) येथील भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या संत बाळूमामा देवस्थानजवळची गट क्रमांक १९१ मधील १२९ गुंठे जमीन देवस्थान समितीचे सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्या नावावर घेतली. या क्षेत्रातील १०६ गुंठे जमीन अदलाबदल करण्यात आली. उर्वरित २३ गुंठे जमीन कोणकेरी यांच्या नावावर शिल्लक राहिली. त्यांनी ती जमीन वटमुखत्यारपत्राने मुरगूड येथील प्रकाश पांडुरंग मांगले यांना दिली. त्यांनी ती जमीन १ कोटी ६८ लाखांना पुन्हा देवस्थानला दिली पण प्रत्यक्षात जागेवर केवळ दोन गुंठेदेखील जमीन शिल्लक नाही. मग समितीच्या कार्याध्यक्ष किंवा इतर विश्वस्तांनी ती जमीन पाहण्याची तसदी का घेतली नाही अशी विचारणा होवू लागली आहे.
बाळूमामा मंदिराच्या जवळ असणारी ही जमीन आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी या जमिनीची गरज होती म्हणून ती विकत घेतली असेल तर त्याबध्दल कुणाचे दुमत नाही. परंतू ही खासगी मालकांकडून जमीन विकत घेताना पुरेसा पारदर्शक व्यवहार झालेला नाही. देवस्थानच्या नावे थेट जमीन न घेता सचिवांच्या नावे घेतल्याने त्यात गैरव्यवहारास संधी राहिली आहे.
कागदोपत्री २३ गुंठे जमीन व्यवहारास दिसत असली तर जाग्यावर मात्र एवढी जमीन शिल्लक नाही. दोन गुंठेच जमीन जाग्यावर असल्याचे दिसते. त्यामुळे हा व्यवहार करताना जमीन तरी तेवढी शिल्लक आहे का हे पाहणे गरजेचे होते. परंतू तसे घडलेले नाही. विश्वस्त मंडळाने सरकारी किंवा खासगी मोजणी आणून ही जागा नक्की किती आहे याची तपासणी करणे आवश्यक होते परंतू त्याकडे कानाडोळा केला आहे.
वाचा : 'बाळूमामा'ची दीड कोटींची २३ गुंठे जमीन पुन्हा देवस्थानलाच विकली; आदमापुरातील विश्वस्तांचा व्यवहार पुन्हा चर्चेत
भक्तांना सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली जमिनी खरेदी करताना वटमुखत्यारपत्राचा आधार घेतला आहे. कोट्यवधींची जमीन खरेदी करताना कोणत्याही जमीन मालकाचा थेट देवस्थान समितीशी व्यवहार न होऊ देता तो मध्यस्थांमार्फत व्यवहार केल्याने सर्वच व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेशासह देशाच्या अनेक राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेले संत बाळूमामा हे गोरगरिब आणि कष्टकरी जनतेचे दैवत आहे. रोज हजारो आणि दर अमावस्येला लाखो भक्त या संतांच्या दर्शनासाठी हजेरी लावतात त्यामुळे मंदिराच्या परिसरात पार्किंग,भक्तनिवास,स्वच्छतागृह यासारख्या सुविधा देण्यासाठी जमिनींची आवश्यकता भासत आहे.नेमका याच संधीचा फायदा घेऊन काही विश्वस्तांनी कारभाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा ढपला पाडण्याचे महापाप केले आहे.
कार्याध्यक्षांकडून प्रतिसाद नाही
बाळूमामा देवस्थान समितीची बाजू समजून घेण्यासाठी लोकमतने समितीचे कार्याध्यक्ष शामराव होडगे यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.