Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:46 IST2026-04-13T10:45:34+5:302026-04-13T10:46:48+5:30
३८० कर्मचारी एकाच ठिकाणी तळ ठोकून : नाबार्डकडून ताशेरे तरीही अंमलबजावणी होईना

Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत ३८० कर्मचारी दहा वर्षांपेक्षा अधिक तर ४६७ कर्मचारी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच शाखेत तळ ठोकून आहेत. तीन वर्षांनी बदली करण्याचे धोरण नाबार्डचे आहे, याबाबत नाबार्डने अनेक वेळा ताशेरे ओढले तरी बँकेकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. एखादा कर्मचारी जास्त काळ एकाच ठिकाणी राहिला तर अपहाराला संधी मिळते, त्यातूनच वारणानगरसह इतर शाखांत अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेत सध्या ११०० कर्मचारी कार्यरत आहेत. नाबार्डच्या धोरणानुसार तीन वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी एकाच ठिकाणी तळ ठोकून आहेत. याबाबत, नाबार्डने अनेकवेळा ताशेरे ओढले असले तरी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेसह प्रत्येक निवडणुकीचे कारण पुढे करत संचालक मंडळ बदलीची प्रक्रिया पुढे पुढे ढकलत आहे. एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्याने तेथील खात्यांचा अंदाज येतो, त्यातून अपहाराचे प्रकार घडतात. त्यामुळे तीन वर्षांनी बदल्या करण्याचे धोरण आहे.
आता अडचणी काय?
लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे कारण सांगून काही संचालकांनी बदल्या करू नये, असे सांगितले होते. या निवडणुका संपून दीड-पावणे दोन वर्षे झाली.
त्यानंतर महापालिका, नगरपालिका, 3 जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकाही झाल्या आहेत. मग, आता बदल्या का होत नाहीत? असा प्रश्न काही कर्मचा-यांमधूनच होत आहे.
शहरातील शाखेत एक कर्मचारी १८ वर्षे
कोल्हापूर शहरात एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवारात असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेत एक कर्मचारी तब्बल १८ वर्षे कार्यरत आहे. असे कमी अधिक प्रमाणात अनेक शाखांमध्ये पहावयास मिळते.
कर्मचारी कमी काम कसे करायचे?
बदल्या करण्यामध्ये कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्याही अडचण ठरत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते. बहुतांशी शाखा दोन-तीन कर्मचाऱ्यांवर चालवायला लागतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रजाही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. "कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत नाबार्डने आम्हाला सूचना केलेल्या आहेत. याबाबत लवकरच प्रक्रिया राबवली जाईल", जी. एम. शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक