Ichalkaranji Municipal Election 2026: चर्चा सकारात्मक, महायुतीला गती येईल - आबिटकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 16:34 IST2025-12-20T16:32:28+5:302025-12-20T16:34:18+5:30
कुणाला किती जागा द्याव्यात, हे आता ठरत नसते

Ichalkaranji Municipal Election 2026: चर्चा सकारात्मक, महायुतीला गती येईल - आबिटकर
इचलकरंजी : महायुतीला गती देणारी चर्चा आजच्या बैठकीत झाली असून, महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढविण्यात येईल. तसेच राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राजवाड्यामध्ये मंत्री आबिटकर, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये जागावाटप व महायुती करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
बैठकीनंतर मंत्री आबिटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुती करण्याचा निर्णय पहिलाच झाला आहे. कुणाला किती जागा द्याव्यात, हे आता ठरत नसते. जागावाटपासंदर्भात वरिष्ठांच्या कानावर टाकले जाते. त्यानंतरच त्यावर निर्णय होतो. मात्र, आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. यामुळे महायुतीला गती प्राप्त होईल.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष असावा, यादृष्टीने प्रकाश आवाडे व मी प्रयत्न करीत आहे. पुढच्या काळात सकारात्मक चर्चा त्यांच्यासोबत होईल.