..अखेर हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे मानधन मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:42 IST2025-03-20T12:41:47+5:302025-03-20T12:42:11+5:30

याबाबत ‘लोकमत’ने फोडली होती वाचा

The honorarium of Hindkesari and Maharashtra Kesari which was pending for the last twelve months has been received | ..अखेर हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे मानधन मिळाले

..अखेर हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे मानधन मिळाले

कोल्हापूर : गेल्या बारा महिन्यांपासून रखडलेले हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न शासनाच्या क्रीडा विभागाकडून मार्गी लावण्यात आला असून, या खेळाडूंचे सुधारित मानधन क्रीडाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले असून, खेळाडूंच्या खात्यात दोन दिवसांत जमा होणार आहे.

याबाबत ‘लोकमत’ने 'हिंद केसरींचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले' या मथळ्याखाली १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वृत्त प्रसिद्ध करून याला वाचा फोडली होती. याची दखल घेत सांगोला (जि. सोलापूर) येथील आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही २१ डिसेंबरला नागपूरच्या अधिवेशनात विधानसभेत प्रश्न उपस्थित करत रखडलेले व घोषणा केलेले वाढीव मानधन त्वरित देण्याची मागणी केली होती. 

अखेर सरकारने ११ मार्चला याचा अध्यादेश काढून १ कोटी ३८ लाख ५७ हजार ५०० रुपये इतकी रखडलेली मानधनाची रक्कम क्रीडाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केली आहे. येत्या दोन दिवसांत ही रक्कम खेळाडूंच्या खात्यावर जमा होणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील १७ खेळाडूंना २२ लाख ८७ हजार ५०० रुपये मानधन मिळणार आहे. पूर्वी पैलवानांना सहा हजार मानधन होते. सरकारने ते पंधरा हजार रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र, तेही रखडल्याने पैलवान अस्वस्थ होते. अखेर राज्य सरकारने शब्द पाळत सुधारित मानधन वर्ग केले आहे.

क्रीडा अधिकारी यांचा सत्कार

पैलवान संग्राम कांबळे यांनीही क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन रखडलेले मानधन त्वरित देण्याची मागणी केली होती. याचा अध्यादेश काढल्याने कांबळे यांनी जिल्हा क्रीडाधिकारी नीलिमा अडसूळ यांचा सत्कार करत आभार मानले. उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, क्रीडाधिकारी अरुण पाटील, पैलवान कुलदीप कांबळे, पैलवान चंद्रदीप कांबळे, पैलवान सचिन राठोड, पैलवान दत्तात्रय ठाणेकर उपस्थित होते.

पैलवानांच्या रखडलेल्या मानधनाबाबत ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला आहे. - दीनानाथसिंह, हिंदकेसरी पैलवान

Web Title: The honorarium of Hindkesari and Maharashtra Kesari which was pending for the last twelve months has been received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.