कोल्हापूर : अलमट्टी धरणाचा फटका कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना बसतो, त्यामुळे कोण म्हणतेय म्हणून त्याची उंची वाढवली जाणार नाही. यासाठी ‘लवाद’ असून राज्य शासन म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे उंची वाढवण्यास विरोध करू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.सभापती शिंदे बुधवारी अल्प काळासाठी कोल्हापुरात आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. सभापती शिंदे म्हणाले, प्रत्येक वर्षी महापुराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचे मोठे नुकसान होते. अलमट्टीच्या उंचीबाबत कर्नाटकच्या मंत्र्यांनी सुतोवाच केले असले तरी कोण तरी म्हणतेय म्हणून उंची वाढवता येणार नाही. राज्य शासन याबाबत केंद्र सरकारकडे ठाेस भूमिका मांडणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन राज्य शासन व निवडणूक आयोगाला करावे लागेल. पण, मतदान प्रक्रियेत मतदाराला सहभाग नोंदविता यावा, यासाठी पावसाचे दिवस त्याची पडताळणी करावी लागणार आहे.गरजेपोटी मित्र, गरज पूर्ण न होताच शत्रूउद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे व ‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे, यावर सभापती शिंदे म्हणाले, राजकारणात गरजेपोटी मित्र आणि गरजा पूर्ण होत नाही म्हटल्यावर शत्रू होतात. त्यामुळे यावर, मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही.
अहिल्यादेवींच्या जयंतीला पंतप्रधान येणार?पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीचा चौंडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित रहावे, अशी मी त्यांना विनंती केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडूनही याबाबत चौकशी झाल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले.