Kolhapur: ‘गोकुळ’बाबतची सुनावणी उद्या, न्यायालयाच्या आदेशावर ठरणार निवडणुकीचे भवितव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:28 IST2026-03-17T18:28:16+5:302026-03-17T18:28:43+5:30
सभासद यादीतील ११०८ संस्थांचा वाद

Kolhapur: ‘गोकुळ’बाबतची सुनावणी उद्या, न्यायालयाच्या आदेशावर ठरणार निवडणुकीचे भवितव्य
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ११०८ दूध संस्था सभासदांबाबत आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच पुढे होणारी सुनावणी आता उद्या, बुधवारी होणार असल्याचे समजते. न्यायालयाच्या आदेशावर संघाच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याने जिल्ह्यातील दूध संस्थांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.
‘गोकुळ’ने दुग्ध विभागाकडे सादर केलेल्या ५४७० संस्था सभासद यादीतील ११०८ सभासदांविरोधात प्रकाश बेलवाडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचकडे याचिका दाखल केली आहे. शासनाच्या नियमानुसार या संस्थांचे दूध संकलन नसल्याची त्यांची हरकत आहे. याबाबत दोनवेळा सुनावणी झाली आहे. त्यावर आज, पुन्हा सुनावणी होणार होती. पण, पटलावर दिसत नसल्याने याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उद्या सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केल्याचे समजते. न्यायालय नेमका निर्णय काय देते? यावरच संघाच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
प्राधिकरणाचीही सावध भूमिका
सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार दुग्ध विभागाने ‘गोकुळ’च्या प्रारूप यादीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार ९ मार्चपासून संलग्न दूध संस्था प्रतिनिधींच्या नावाचे ठराव मागवले जाणार होते. मात्र, सभासदांचा मुद्दा न्यायालयात असल्याने दुग्ध विभागाने याबाबत निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले होते. मात्र, अद्याप त्यांच्याकडून काहीच आले नसल्याचे समजते.
परवाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने १७ मार्चला सुनावणीची तारीख दिली होती. पण न्यायालयाच्या पटलावर तारीख दिसत नसल्याने आम्ही वकिलांमार्फत उद्या सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. - प्रकाश बेलवाडे (याचिकाकर्ता)