मरावे परी, कीर्तीरूपे उरावे; सांगली-कोल्हापूरमध्ये ग्रीन कॉरिडॉर, तिघांना जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:51 IST2025-12-20T11:49:53+5:302025-12-20T11:51:43+5:30
कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्यांचे समन्वय : बंगळुरूहून सेसना विमानाची विशेष सेवा

मरावे परी, कीर्तीरूपे उरावे; सांगली-कोल्हापूरमध्ये ग्रीन कॉरिडॉर, तिघांना जीवदान
कोल्हापूर : “मरावे परी, कीर्तीरूपे उरावे” या स्वामी रामदासांच्या उक्तीप्रमाणे अवयवदानातून अनेकांना नवजीवन देण्याची संधी आधुनिक वैद्यकीय शास्त्रामुळे साकारली. या मानवतावादी कार्यासाठी सांगली-कोल्हापूरदरम्यान उभारण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरमुळे शुक्रवारी अवयव वाहतूक अत्यंत वेगाने आणि सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यात आली.
रेड बोर्ड एअरवेजचे सेसना ९० (नोंदणी क्रमांक व्हीटी-ईजेझेड) हे विमान बंगळुरू येथून सकाळी ९.४० वाजता कोल्हापूर विमानतळावर उतरले. या विशेष मोहिमेसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून अतिरिक्त विमान वाहतूक नियंत्रण (एटीसी) सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. सांगली ते कोल्हापूर या रस्त्यावरील ग्रीन कॉरिडॉरचा अंतिम टप्पा कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी अत्यंत समन्वयाने हाताळला.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या टीमने अतिरिक्त एटीसी अवधी उपलब्ध करून देण्यासोबतच ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या नियमांनुसार आवश्यक सुरक्षा परवाने तत्काळ मंजूर केले. कोल्हापूर पोलिसांच्या विमानतळ सुरक्षा पथकाने आवश्यक ती पडताळणी करण्यात आली. ग्राउंड हँडलिंगसाठी कलिंग इंदिरा एअरपोर्ट सर्व्हिसेसमार्फत सर्व दस्तावेजांची पूर्तता, विविध यंत्रणांमधील समन्वय, अवयव घेऊन येणाऱ्या ॲम्ब्युलन्सची रिअल-टाइम स्थिती तसेच वैमानिक दलाची तयारी याबाबत माहितीचे प्रभावी प्रसारण करण्यात आले. हे महत्त्वाचे कार्य संदीप सूर्यवंशी, प्रवीण आढाव आणि विकास पुजारी यांनी पार पाडले.
अवयवदानासाठी प्रोत्साहन
दरम्यान, अवयव दानासाठी इच्छुक नागरिकांनी केंद्र सरकारच्या https://notto.abdm.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रीन कॉरिडॉरसारख्या व्यवस्थेमुळे वेळेत अशा जीवनदायी मोहिमांना गती मिळत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण होत आहे.