महायुतीने सत्ता मिळवली, विश्वासार्हता गमावली; काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:29 IST2025-04-12T15:27:21+5:302025-04-12T15:29:05+5:30
सत्ता असो नसो 'अजिंक्यतारा'वरची गर्दी कायम

महायुतीने सत्ता मिळवली, विश्वासार्हता गमावली; काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा घणाघात
विश्वास पाटील, पोपट पवार
काँग्रेसचे फायरब्रँड नेते म्हणून सतेज पाटील यांची राज्यभर ओळख आहे. प्रचंड संघटनकौशल्य, निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी, घेतलेला प्रश्न तडीस नेण्याची धमक या नेतृत्वगुणामुळे काँग्रेसचा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शक्तिपीठ महामार्गाविरोधात त्यांनी राज्यभर आवाज बुलंद केल्याने त्यांच्या नेतृत्वाला अधिक झळाळी मिळाली. आज, शनिवारी सतेज पाटील यांचा वाढदिवस. त्याच्या पूर्वसंध्येला आमदार पाटील यांनी 'लोकमत'शी संवाद साधला.
कोल्हापूर : लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफ यासारखी आश्वासने देऊन महायुती सरकार सत्तेवर आले; मात्र या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याने तीनच महिन्यांत या सरकारने जनतेप्रती असणारी विश्वासार्हता पूर्णत: गमावली आहे. या सरकारच्या चुकीच्या गोष्टी जनतेसमोर मांडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरचा लढा अधिक तीव्र करतील, अशी भावना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
प्रश्न-साबरमतीत झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाने कोणता विचार दिला..?
उत्तर -सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात पक्षाची पुढील काळासाठी ध्येयधोरणे, रोडमॅप ठरवण्यात आला. जातीनिहाय जनगणना, वंचितांना न्याय, ओबीसीसह इतर छोट्या घटकांना सामावून घेण्याची भूमिका यावर येथे चर्चा झाली. सामाजिक समानतेचा विचार या अधिवेशनात पुन्हा एकदा चर्चिला गेला. या अधिवेशनात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले मार्गदर्शन प्रचंड ऊर्जादायी होते. काँग्रेस होती म्हणूनच देशाची घटना इतकी चांगली लिहू शकलो, असे स्वत: डॉ.आंबेडकर यांनीच नोंदवून ठेवले आहे. त्यामुळे घटनेने, डॉ.आंबेडकर यांनी दिलेला सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार हाच या देशाचा मुलाधार आहे आणि कितीही किंमत मोजावी लागली तरी तोच विचार घेऊन काँग्रेसला पुढे जायचे आहे. वंचित घटकांना सोबत घेऊन जाण्याचा विचार काँग्रेस कधीही सोडणार नाही हाच संदेश या अधिवेशनाने उभ्या देशाला दिला.
प्रश्न- या अधिवेशनामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना कोणते बळ मिळाले ?
उत्तर : या अधिवेशनात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशीही चर्चा करण्यात आली. त्यांची मते जाणून घेण्यात आली. या अधिवेशनात जे ठराव, निर्णय झाले यातून पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला अधिकाधिक निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. म्हणजेच या पदाला प्रचंड महत्त्व येणार आहे; मात्र हे करताना जिल्हाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेतही काही नियम, निकष लावले आहेत. स्थानिक जातीय समीकरणे, ज्याची निवड केली जाणार आहे त्याची प्रतिमा, पक्षासाठी त्याची वेळ देण्याची तयारी हे निकष पाहूनच संबंधिताची निवड केली जाईल. शिवाय ज्याला जी पक्षसंघटनात्मक जबाबदारी दिली जाईल तो त्यासाठी उत्तरदायित्व देण्यासाठीही जबाबदार असेल. प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन होऊन त्याचा अहवाल वरिष्ठांना द्यावा लागणार आहे.
प्रश्न -महायुतीच्या कारभाराकडे कसे पाहता... ?
उत्तर : सध्याचा महायुतीचा कारभार प्रचंड दिशाहीन आहे. कोणाचा पायपूस कोणाला नाही अशी स्थिती आहे. नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले. यात राज्याचा अर्थसंकल्प मांडताना तब्बल ५४ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या. मुळात या पुरवण्या मागण्या किती असाव्यात याचेही एक धोरण ठरले आहे; मात्र या सरकारने हे सगळेच नियम मोडले आहेत. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफ या घोषणा करून सरकार सत्तेवर आले; मात्र यातील एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. आता ते शब्द फिरवत आहेत. या सरकारने किती महामंडळाच्या घोषणा केल्या ?, आहे का एकाला तरी निधी. निवडणूक प्रचारात राेज एक महामंडळ जाहीर केले, मात्र, त्याला निधी कोण देणार ? धोरण आणि अंमलबजावणी यांच्यात खूप मोठी तफावत आहे. केवळ प्रसिद्धीसाठी धाेरण, घोषणा करायच्या, मात्र अंमलबजावणी होत नसल्याने त्यांच्याप्रती असणारी विश्वासार्हता संपली आहे.
प्रश्न : शक्तिपीठ महामार्गाबाबत पुढील रणनीती काय असेल
उत्तर : या महामार्गाला राज्यभरातील संबंधित जिल्ह्यांमधून तीव्र विरोध आहे. मात्र, सरकार विविध मार्गाने तो मोडून काढण्याचा प्रयत्न करतेय. आता सर्वच जिल्ह्यांमध्ये या विरोधात मोर्चे, आंदोलने होताहेत. हा लढा निश्चितपणाने अधिक तीव्र केला जाईल. उभा राहिलेले आंदोलन पाहून सरकारची भाषाही नरमाईची झाली आहे.
प्रश्न : विधानसभेला एवढा मोठा पराभव कशामुळे झाला..? नेमके कुठे चुकले?
उत्तर : विधानसभेला आम्ही तिन्ही पक्ष चांगले लढलो. मात्र, महायुतीने लाडकी बहीण योजनेची केलेली घोषणा, जागा वाटप जाहीर करण्यात गेलेला अधिकचा वेळ व लोकसभेत मिळालेल्या यशामुळे थोडासा गाफीलपणा आम्हाला विधानसभेला नडला. मात्र, हे जरी खरे असले तरी आजही आमची ईव्हीएमवर शंका आहे, पण पुरावे नाहीत त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही. राज्यात महाविकास आघाडी म्हणून कमीत कमी १३२ तर कोल्हापूर जिल्ह्यात किमान ५ जागा जिंकू असा आम्हाला विश्वास होता; पण तसे घडले नाही.
प्रश्न-आपली पुढची वाटचाल कशी असेल..?
उत्तर : राजकारणात यशापयश येत असते. त्यामुळे त्याचा फारसा फरक पडत नाही. ही परिस्थिती कायम राहील असेही नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे. पराभवाने आम्ही जरूर निराश झालो; पण लढणे सोडलेले नाही, सोडणार नाही. या सरकारची चुकीची धाेरणे जनतेसमोर घेऊन जात आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लढाई सुरूच राहील.
सत्ता असो नसो 'अजिंक्यतारा'वरची गर्दी कायम
सत्ता गेली की कार्यकर्ते पांगतात. मात्र, 'अजिंक्यतारा'वरची गर्दी तसूभरही कमी होत नाही याकडे लक्ष वेधले असता आमदार पाटील म्हणाले, लोकांचे प्रश्न नेमके काय आहेत, काय असतात, ते कसे साेडवले पाहिजेत, याचा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असल्याने आला आहे. अधिकाऱ्यांशीही उत्तम संपर्क ठेवला आहे. काम घेऊन आलेल्या माणसाला आपल्याला काही ना काही दिलासा मिळेल, असे वाटते. त्यामुळे सत्ता असली-नसली तरी नागरिकांचा ओघ कायम आहे. तो कायम राहील. त्यांच्या अडीअडचणी सोडवणे ही आपली प्रथम बांधिलकी आहे.
आरोग्याबाबत जागरूक
राजकारणात कितीही धावपळ असली तरी आरोग्याबाबत आमदार पाटील कमालीचे जागरूक आहेत. रोज सकाळी एक तास जिममध्ये व्यायाम करतात. सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारी बाहेर कार्यक्रम असला की घरून जेवणाचा डब्बा नेतात. हा नियम कधी चुकवत नाहीत. रात्री हलकासा आहार घेऊन सहा-साडे सहा तासांची झोप घेतात. आई-वडिलांच्या कृपेने जन्मजात चांगली प्रकृती लाभली. त्यामुळे आरोग्य ठणठणीत आहे. कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही.