Ladki Bahin Yojana: 'त्या' सर्व महिलांचे अर्ज बाद; महिला बाल विकासकडे चौकशीसाठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:30 IST2025-08-14T12:29:16+5:302025-08-14T12:30:21+5:30
लाडकी कोण कसं ठरवणार ?

Ladki Bahin Yojana: 'त्या' सर्व महिलांचे अर्ज बाद; महिला बाल विकासकडे चौकशीसाठी गर्दी
कोल्हापूर : ज्या कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, त्या सर्व महिलांचा लाभ शासनाने बंद केला आहे. या महिलांची तेलही गेले तूपही गेले, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे चौकशीसाठी महिलांची गर्दी वाढली आहे. पुढील १५ दिवसांत सगळ्या बोगस लाडक्या बहिणींचे अर्ज मोठ्या प्रमाणात बाद होणार असून, त्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा ताप निस्तरताना शासनाच्या नाकी नऊ येत आहेत. निकषात बसत नसलेल्या महिलांनी एवढेच काय पुरुषांनीदेखील या योजनेचा लाभ घेतला आहे. असे सगळे बोगस लाभार्थी शोधण्याचे काम शासन स्तरावर सुरू आहे.
एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, असा निकष होता पण सासू, सुना, लेकी अशा सगळ्यांनीच लाभाचे पैसे घेतले आहेत. अशा कुटुंबातील सर्वच महिलांचे अर्ज शासनाने बाद ठरवले असून, त्यांचा लाभ बंद केला आहे. पूर्वी तर लाभ व्यवस्थित मिळत होता, आता का बंद झाला, अशी विचारणा करण्यासाठी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने कसबा बावड्यातील जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे जात आहेत.
दुसरीकडे अंगणवाडीसेविकांमार्फत महिलांनी अर्ज करताना दिलेल्या कागदपत्रांची, तसेच गृहभेटीद्वारे माहिती घेतली जात आहे. पुढील १० ते १५ दिवसात सगळ्या बाबी स्पष्ट होऊन निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे बाद केली जाणार आहेत.
लाडकी कोण कसं ठरवणार ?
एकाच कुटुंबातील २ पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल नेमक्या कोणत्या महिलेचा अर्ज बाद करायचा हा मोठा प्रश्नच आहे. सासू, सुना लेकी यापैकी एकीचा अर्ज बाद केला तर भांडणाला कारण होणार आहे. घराघरात भांडणे होतीलच पण माझाच अर्ज का बाद केला म्हणून महिला कार्यालयाला जाब विचारायचा येणार. तो तापच नको म्हणून सगळ्याच महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. पुढे कदाचित त्या कुटुंबातील दुसऱ्या महिलेचे ना हरकत पत्र घेऊनच अन्य महिलेला लाभ मंजूर करतील.