Kolhapur: मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला, वडिलांनी अपहरण करून जावयाला बेदम चोपला; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:10 IST2025-02-12T12:07:25+5:302025-02-12T12:10:07+5:30
तरुणाची मिरजेतून सुटका, चौघांचा शोध सुरू

Kolhapur: मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला, वडिलांनी अपहरण करून जावयाला बेदम चोपला; तिघांना अटक
कोल्हापूर : इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांनी जावयाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. ११) सकाळी विशाल मोहन आडसूळ (वय २६, रा. भुये, ता. करवीर) याची मिरजेतून सुटका केली. रविवारी (दि. ९) रात्री सव्वानऊच्या सुमारास भुयेवाडी कमानीपासून त्याचे अपहरण झाले होते.
याप्रकरणी मुलीचे वडील श्रीकृष्ण महादेव कोकरे (वय ४५, रा. वाघमोडेनगर, कुपवाड, ता. मिरज) याच्यासह धीरज ऊर्फ हणमंत नामदेव पाटील (५६, रा. कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली) आणि राजेंद्र परमेश्वर कट्टीमणी (३३, रा. कुपवाड एमआयडीसी, सांगली) यांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील आणखी चौघांचा शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री विशाल आडसूळ याचे चार ते पाच जणांनी भुयेवाडी कमानीपासून अपहरण केल्याची फिर्याद करवीर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन करवीर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनेही या गुन्ह्याचा तपास सुरू केला. मिरजेतील बेदाणा व्यापारी श्रीकृष्ण कोकरे याने साथीदारांच्या मदतीने विशालचे अपहरण केल्याची माहिती कॉन्स्टेबल रामचंद्र कोळी यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने मिरजेत जाऊन कोकरे याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने विशालचे अपहरण करून त्याला मिरज न्यायालयाच्या मागे असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये डांबून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने जाऊन बंद फ्लॅटमधून विशालची सुटका केली. अपहरणकर्त्यांनी बेदम मारहाण करून हातपाय बांधून त्याला डांबले होते. गुन्ह्यातील कार, दुचाकी आणि मोबाइल असा साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आंतरजातीय लग्नाचा राग
विशाल आणि श्रृती या दोघांची वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्री आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. सात महिन्यांपूर्वी त्यांनी पळून जाऊन जोतिबा डोंगर येथे लग्न केले. याचा राग मुलीचे वडील कोकरे यांना होता. याच रागातून त्यांनी जावयाचे अपहरण केले.
अनर्थ टळला
पोलिसांनी वेळीच विशालचा शोध घेऊन त्याची सुखरूप सुटका केली. एखादा दिवस उशीर झाला असता तर त्याच्या जिवाचे बरेवाईट झाले असते. जिवे मारण्याच्या उद्देशानेच त्याचे अपहरण केल्याची कबुली अटकेतील संशयितांनी दिली. दीड महिन्यापूर्वी एकदा त्यांनी अपहरणाचा प्रयत्न केला होता.
पाळत ठेवून अपहरण
जावयाचे अपहरण करण्यासाठी कोकरे याने मित्रांना पैसे दिले होते. संशयितांनी आठवडाभर त्याच्यावर पाळत ठेवून माहिती काढली. त्यानंतर रविवारी रात्री भुयेवाडी कमानीजवळ कारमध्ये घालून त्याचे अपहरण केले. जातानाच हातपाय बांधून त्याला मारहाण केली होती. पळून जाऊन लग्न केल्यानंतर तो पत्नीसह भुयेवाडी येथे राहत होता. त्याचे कुटुंबीय निगवे दुमाला (ता. करवीर) येथे राहतात.