Kolhapur: जिल्हाधिकारी अध्यक्ष, पण तरीही पर्यावरण समिती कागदावरच; स्थापनेपासून एकही बैठक नाही
By संदीप आडनाईक | Updated: July 5, 2025 19:22 IST2025-07-05T19:22:15+5:302025-07-05T19:22:38+5:30
पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये नाराजी

संग्रहित छाया
संदीप आडनाईक
कोल्हापूर : जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्यासह इतरही शासकीय अधिकारी या समितीमध्ये सदस्य असताना जिल्हा पर्यावरण समिती कागदावरच आहे. सहा महिन्यांतून एकदा बैठक घेण्याचा निर्णय असताना नव्याने स्थापन झालेल्या या समितीची एकही बैठक झालेली नाही. याला या समितीचे सदस्य उदय गायकवाड, हेमंत आराध्ये, रामेश्वर पतकी आणि देवेंद्र खराडे यांनीही दुजोरा दिला आहे.
जिल्ह्यात पर्यावरणविषयक जनजागृती, पर्यावरणाशी संबंधित सर्व विभागांशी समन्वय करून पर्यावरणीय समस्या शोधून त्यावरील उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने जिल्हा पातळीवर जिल्हा पर्यावरण समितीचे गठण करण्याबाबत १९८८ मध्ये निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा जनसंपर्क व माहिती अधिकारी, जिल्हा वन अधिकारी, अध्यक्ष नामनिर्देशित पर्यावरण क्षेत्रातील दोन तज्ज्ञ प्रतिनिधी, तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणारे अशासकीय सेवाभावी संस्थांचे दोन प्रतिनिधी आणि सर्व आमदार हे सदस्य असतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सदस्य सचिव असतात.
शासन निर्णयाला केराची टोपली
जिल्हा पर्यावरण समितीची बैठक कमीतकमी ६ महिन्यांतून एकदा व्हावी, बैठक सामान्यत: जानेवारी आणि मे अशी महिन्यातून दोनवेळा आयोजित करावी, बैठकीचे इतिवृत्त पर्यावरण विभागाला सादर करावे, असेही निर्णयात म्हटलेले आहे. या निर्णयाला जिल्ह्यात केराची टोपली दाखविली आहे, अशी स्थिती आहे.
नियुक्त झाल्यापासून या समितीची एकही बैठक झालेली नाही. उलट विभागीय आयुक्त, पर्यावरण मंंत्रालय, संबंधित खात्याचे मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन यासंदर्भात पत्रव्यवहारही केला. ही बैठक न झाल्याने प्रशासकीय अधिकारी याबाबत गंभीर नाहीत, हेच सिद्ध होते. -रामेश्वर पतकी, सदस्य, जिल्हा पर्यावरण समिती, कोल्हापूर.
वर्षात समितीचे कामकाज व कार्यकक्षा निश्चित केली असताना, स्थापन झाल्यापासून या समितीची एकही बैठक झालेली नाही. याविषयावर काम कसे करायचे. -देवेंद्र खराडे, सदस्य, जिल्हा पर्यावरण समिती, कोल्हापूर.
समिती सदस्यांची किमान ओळख व्हावी, कामाची दिशा ठरवावी यासाठी समितीची बैठक गरजेची आहे. -उदय गायकवाड, सदस्य, जिल्हा पर्यावरण समिती, कोल्हापूर.