Kolhapur: पदाधिकाऱ्यांसह सचिवाचा कारभार; दूध संस्थेत पाच लाखांचा अपहार, संस्थेत नाट्यमय सत्तांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:21 IST2025-09-04T18:21:24+5:302025-09-04T18:21:39+5:30
माजगाव येथील इंदिरा दूध संस्थेच्या १२ संचालकांवर गुन्हा

Kolhapur: पदाधिकाऱ्यांसह सचिवाचा कारभार; दूध संस्थेत पाच लाखांचा अपहार, संस्थेत नाट्यमय सत्तांतर
पोर्ले तर्फ ठाणे : माजगाव (ता. पन्हाळा) येथील इंदिरा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेत संचालकांसह सचिवाने पाच लाख ११ हजार रुपये रकमेचा गैरव्यवहार केल्याचे फेर लेखापरीक्षण अहवालात उघड झाले आहे. तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांसह सचिवांचा अपहारात सहभाग असल्याने लेखापरीक्षक सतीश वसंतराव पाडळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलिस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तत्कालीन अध्यक्ष रवींद्र जयवंत चौगले, उपाध्यक्ष शिवाजी बाबूराव जाधव, संचालक उत्तम जगन्नाथ गुरव, रवींद्र केशव पाटील, तुकाराम रामचंद्र मगदूम, नामदेव सदाशिव माने, अशोक यशवंत कांबळे, सीमा उदय खोत, उज्वला आकाराम माने, बाजीराव सदाशिव चौगले (मृत), सचिव जयवंत गणपती कुंभार (मृत), नेताजी श्रीपती कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्च २०२४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर आरोपी असणाऱ्या संचालकांकडे संस्थेच्या कागदपत्रांची मागणी केली असता ती देण्यास टाळाटाळ झाल्याने, सत्ताधारी गटाने सन २०२१-२२ या कालावधीमधील फेर सरकारी लेखीपरीक्षण केले. संस्थेत रोखीने जमा झालेली रक्कम, किर्दीप्रमाणे असणारी रोख शिल्लक रक्कम तेरीज पत्रकास आणि ताळेबंदास दर्शविलेली नाही, शिवाय बँकेत भरणा चलन पावती नसल्याचे लेखापरीक्षणात आढळून आले.
तत्कालीन पदाधिकारी असणाऱ्या आरोपींनी अधिकाराचा गैरवापर करून संगनमताने परस्पर संस्थेत ५ लाख ११ हजार २९८ रुपयांचा घोटाळा केल्याचे फेर लेखी परीक्षणात उघड झाले. त्यानंतर संबंधितांना लेखापरीक्षकांनी गैरव्यवहार केलेली रक्कम भरण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. याला सहा महिन्यांची कालावधी उलटूनही संबंधितांनी गैरव्यवहाराची रक्कम वेळेत न भरल्याने लेखापरीक्षकांनी १२ जणांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून त्यांच्या विरोधात पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
संस्थेत नाट्यमय सत्तांतर
२५० सभासद असणाऱ्या इंदिरा दूध संस्थेची मार्च २०२३ मध्ये निवडणूक झाली होती. निवडणुकीत दोन्ही गटांचे ५/५ संचालक निवडून आल्याने, चिठ्ठी टाकून अध्यक्ष, उपाध्यक्ष, निवड झाली होती. विरोधी पाच संचालकांना हे पटले नसल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने प्रशासक आले. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये फेर निवडणूक झाल्याने चिठ्ठीद्वारे पदाधिकारी झालेल्या गटाला १० जागा मिळाल्याने संस्थेत सत्तांतर झाले.