कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय दृष्टिक्षेपात; पोलिस ठाण्यांची माहिती मागवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:23 IST2026-03-23T15:22:52+5:302026-03-23T15:23:40+5:30

१३ पोलिस ठाण्यांचा समावेश, अहवाल महासंचालक कार्यालयास सादर होणार

The demand of the Police Commissionerate in Kolhapur is likely to finally be resolved | कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय दृष्टिक्षेपात; पोलिस ठाण्यांची माहिती मागवली

संग्रहित छाया

उद्धव गोडसे

कोल्हापूर : गेल्या १०-१२ वर्षांपासून रखडलेली कोल्हापूर येथील पोलिस आयुक्तालयाची मागणी अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रस्तावित आयुक्तालयासाठी १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील लोकसंख्येपासून ते गुन्हेगारीपर्यंत विविध मुद्द्यांची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाने तातडीने मागवली आहे. त्यानुसार अहवाल तयार झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोल्हापुरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्तालय सुरू व्हावे, अशी मागणी गेल्या १०-१२ वर्षांपासून सुरू आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याला मूर्त रूप मिळाले नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झाल्यापासून पोलिस आयुक्तालयाची गरज पुन्हा चर्चेत आली. पोलिस महासंचालक कार्यालयाने पत्रव्यवहार करून पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून विविध प्रकारची माहिती मागवून घेतली आहे. 

यात कोल्हापूर शहरासह आसपासचा परिसर आणि इचलकरंजीसह आसपासच्या परिसरातील १३ पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गावांची संख्या, लोकसंख्या, गुन्हे, दंगली, आंदोलने, मूलभूत सुविधा, सध्याचे उपलब्ध पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या याची माहिती मागवली आहे.

सर्व माहिती तातडीने सोमवारपर्यंत (दि. २३) पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे जमा करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. बहुतांश पोलिस ठाण्यांनी माहिती जमा केली आहे. महासंचालक कार्यालयाकडून जोर वाढल्याने कोल्हापुरात लवकरच पोलिस आयुक्तालय सुरू होऊ शकते, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

असा होईल फायदा

पोलिस आयुक्तालय सुरू होताच जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांकडे असलेले प्रतिबंधात्मक कारवायांचे अधिकार पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांकडे येतात. यामुळे कारवाया गतिमान होतात. पोलिस ठाण्यांची संख्या वाढते. मनुष्यबळ वाढते. यामुळे पोलिस दलाचे बळकटीकरण होऊन कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होते.

शहर, ग्रामीण स्वतंत्र कार्यभार

कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरातील पोलिस ठाण्यांसाठी आयुक्तालय सुरू होईल. यात १८ ते २० पोलिस ठाण्यांचा समावेश असेल. उर्वरित १५ ते २० पोलिस ठाण्यांचा कार्यभार कोल्हापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातून चालेल.

Web Title : कोल्हापुर में पुलिस आयुक्तालय जल्द ही संभव; पुलिस स्टेशनों से जानकारी मांगी गई

Web Summary : कोल्हापुर में लंबे समय से प्रतीक्षित पुलिस आयुक्तालय जल्द ही साकार होने की संभावना है। 13 पुलिस स्टेशनों के जनसांख्यिकी और अपराध दरों पर जानकारी मांगी गई है। इसका उद्देश्य कोल्हापुर और इचलकरंजी क्षेत्रों में कानून और व्यवस्था में सुधार करना है।

Web Title : Kolhapur Police Commissionerate Likely Soon; Information Requested from Police Stations

Web Summary : Kolhapur's long-awaited police commissionerate is likely to materialize. Information on 13 police stations' demographics and crime rates has been requested. This aims to improve law and order, increase police presence, and streamline preventative actions in Kolhapur and Ichalkaranji areas.