Kolhapur-Gokul election: जागावाटपात ठराव की पक्षाला महत्व?, चर्चेआधीच निर्माण झाला पेच 

By समीर देशपांडे | Updated: March 6, 2026 12:12 IST2026-03-06T12:11:42+5:302026-03-06T12:12:26+5:30

भाजपच्या हालचाली वाढल्या, आज बैठक

The decision to contest the elections together as a grand alliance of Gokul kolhapur, However the issue of importance of the party in seat distribution or resolutions has created a dilemma | Kolhapur-Gokul election: जागावाटपात ठराव की पक्षाला महत्व?, चर्चेआधीच निर्माण झाला पेच 

संग्रहित छाया

समीर देशपांडे

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची पंचवार्षिक निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढण्याचा निर्णय झाला असला तरी जागा वाटप करताना पक्षाला महत्त्व द्यायचे की गोळा केलेल्या ठरावांना यावरून पेच निर्माण झाला आहे. या निवडणुकीत पक्षीय ताकदीपेक्षा ठरावच निर्णायक ठरतात. त्यामुळे ठराव हाच जर आघाडीतील जागा वाटपाचा निकष झाल्यास तो भाजपला मान्य होणार का, हा प्रश्न आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारच्या बैठकीत मात्र तसेच सूतोवाच केले आहे.

ठराव गोळा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू होईल असे सध्याचे चित्र आहे. याबाबत मुंबईतील बुधवारच्या बैठकीत ठोस काही ठरणार नव्हतेच. तरीही किमान विषय चर्चेला आला आणि कोणाची काय मते आहेत हे तरी समोर आले. मात्र, याबाबतसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

गेल्या निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या जोडीने महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या आघाडीचा सपशेल पराभव केला होता. परंतु नंतर राज्याचेच सगळे राजकारण बदलले आणि सतेज पाटील एकीकडे आणि ‘महायुती’च्या झेंड्याखाली उर्वरित सर्वजण एकत्र आले आहेत. सहकारात पक्षीय जोडे नकोत असे म्हणत मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांनाही सोबत घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खचितच प्रयत्न केले असते. परंतु, नेते अजित पवार यांच्या निधनानंतर हे सगळं आवाज चढवून बोलणारा नेताच गमावल्याने मुश्रीफ तडजोडीच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

आता महायुतीमध्येच जागा वाटपावरून हातघाई होण्याची चिन्हे आहेत. ठराव गोळा करण्यात मुश्रीफ हे महायुतीमधील इतर नेत्यांच्या फार पुढे गेले आहेत. त्यामुळे ते ज्याच्याकडे ठराव जास्त त्याला उमेदवारी या सूत्रावर ठाम आहेत. मुंबईच्या बैठकीत त्यांनी या सूत्रावरच जोर दिला. तेव्हा इतर नेत्यांनी पक्षनिहाय किती जागा देणार ते ठरवूया आणि सर्वजण मिळून ठराव गोळा करूया अशी सामूहिक कल्याणाची भूमिका मांडली. जी मुश्रीफ यांना मान्य होणे कदापिही शक्य नव्हती. त्यामुळे ठराव प्रक्रिया संपल्यानंतरच पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

१५० चा मुश्रीफ यांचा निकष काहींना अडचणीचा

महायुतीमधून ज्याला ‘गोकुळ’ची उमेदवारी हवी असेल त्याच्याकडे किमान १५० ठराव हवेत असा निकष मुश्रीफ यांनी लावला आहे. तो अनेकांना अडचणीचा ठरणारा असल्याने पक्षनिहाय जागा मागण्याचा मुद्दा समोर आणला जात आहे.

भाजपच्या हालचाली वाढल्या, आज बैठक

ठरावाचा मुद्दा मुश्रीफ यांनी ठामपणे मांडल्याने सावध झालेल्या भाजपने या पातळीवरही आपण कमी पडू नये यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठीच बैठकीच्या दुसऱ्या दिवशी निरोप देत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ‘गोकुळ’बाबतची महत्त्वाची बैठक आज, शुक्रवारी ११ वाजता भाजपच्या कार्यालयात बोलावली आहे. वाढीव १२०० संस्थांच्या बळावर राष्ट्रवादी आणि शिंदेसेना अधिक जागांचा आग्रह करू शकते. त्यामुळेच भाजप खडबडून जागा झाला आहे.

Web Title : कोल्हापुर गोकुल चुनाव: सीट बंटवारे, प्रस्तावों के महत्व पर विवाद।

Web Summary : गोकुल चुनाव के लिए महायुति गठबंधन में सीट बंटवारे को लेकर असहमति। प्रस्तावों बनाम पार्टी की ताकत पर ध्यान केंद्रित है, जिसमें हसन मुश्रीफ प्रस्ताव संख्या का समर्थन कर रहे हैं। बहस के बीच भाजपा की रणनीति।

Web Title : Kolhapur Gokul election: Dispute over seat allocation, importance of resolutions.

Web Summary : Disagreement arises within the Mahayuti alliance regarding seat allocation for the Gokul election. Focus is on the importance of resolutions versus party strength, with Hasan Mushrif favoring resolution count. BJP strategizes amid the debate.