Kolhapur: पाच दिवसांनी अंबाबाईचे डोळेभरून दर्शन, ‘अंबा माता की जय’चा गजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:20 IST2026-03-19T12:19:58+5:302026-03-19T12:20:23+5:30
संवर्धनामुळे बंद होते दर्शन : दगडी भिंतींचे खुलले मूळ रूप

Kolhapur: पाच दिवसांनी अंबाबाईचे डोळेभरून दर्शन, ‘अंबा माता की जय’चा गजर
कोल्हापूर : मंदिर व मूर्ती जतन संवर्धनाच्या कामासाठी गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन बुधवारपासून पूर्ववत सुरू झाले. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता अंबाबाईच्या मूळ मूर्तीत प्राणप्रतिष्ठा, अभिषेक व आरती करून देवीच्या दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर भाविकांनी ‘अंबा माता की जय’चा गजर केला. सॅन्ड ब्लास्टिंगसह संवर्धनाची कामे झाल्याने मंदिराच्या दगडांचेही मूळ सौंदर्य खुलले आहे.
श्री अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास आराखड्यांतर्गत मंदिरात सध्या पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींची कामे केली जात आहेत. यामध्ये मंदिराच्या मूळ दगडी बांधकामाचे जतन संवर्धन केले जात आहे. हे बांधकाम अधिक मजबूत करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर केला जात आहे. गाभाऱ्यातील संवर्धनाच्या कामाला शनिवारपासून सुरुवात झाल्याने त्या दिवसापासून अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन चार दिवसांसाठी बंद करण्यात आले होते.
मूळ मूर्तीच्या संवर्धनामुळे एक दिवस आणखी वाढला. त्यामुळे गेले पाच दिवस भाविकांना कलश दर्शन व उत्सवमूर्तीचे दर्शन घ्यावे लागले. बुधवारी मात्र सकाळी साडेआठ वाजता देवीच्या मूर्तीत पुन्हा प्राणप्रतिष्ठा, अभिषेक व आरती करून दर्शनाला पूर्ववत सुरुवात झाली. भाविकांना आज गुरुवारपासून चांदीच्या उंबऱ्यापासून देवीचे दर्शन घेता येणार आहे.
जतन संवर्धनाच्या कामामुळे मंदिरातील दगडी भिंतींवरील रंग जाऊन त्याचे मूळ स्वरूप खुलले आहे. शिवाय बांधकाम अधिक मजबूत झाले आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण मंदिरात हे काम केले जाणार आहे.