तृतीयपंथीयांसाठी देशातील पहिले रेशन दुकान कोल्हापुरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 19:36 IST2025-10-06T19:35:55+5:302025-10-06T19:36:48+5:30
मैत्री संघटनेकडे पत्र सुपूर्द : महसूल विभागाचे ऐतिहासिक पाऊल

तृतीयपंथीयांसाठी देशातील पहिले रेशन दुकान कोल्हापुरात
कोल्हापूर : तृतीयपंथी समुदायासाठी कार्यरत असलेल्या मैत्री संघटनेला रेशन दुकान चालवायला देण्याचा निर्णय महसूल विभागाने शनिवारी घेतला. तृतीयपंथीयांना चालवण्यासाठी मिळालेले देशातील हे पहिले रेशन दुकान कोल्हापुरातील समुदायाला मिळालेले आहे. महसूल विभागाने उचललेले हे ऐतिहासिक पाऊल आहे, असे मत या संघटनेने व्यक्त केले आहे.
कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉल येथे राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात या संस्थेला शनिवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत मैत्री संघटनेला रेशन दुकान दिल्याचे पत्र देण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचा आणि सर्व संबंधित अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, पुरवठा निरीक्षक अक्षय ठोंबरे, अन्नधान्य पुरवठा विभाग प्रमुख महेश ढवळे, नितीन धापसे पाटील आणि महेश काटकर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आणि राज्य तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळाच्या सदस्य मयुरी आळवेकर यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी शिवानी गजबर, अफजल बारस्कर, सुहासिनी आळवेकर, अंकिता आळवेकर तसेच जिल्ह्यातील तृतीयपंथीय उपस्थित होते.
हे रेशन दुकान केवळ रोजगाराचे साधन नाही, तर तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेशाचे प्रतिक आहे. - मयुरी आळवेकर, सदस्य, राज्य तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळ.