उमेदवारीचा घोर; बैठकांचा मात्र जोर, लोकसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हालचाली गतिमान 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 01:38 PM2024-01-09T13:38:49+5:302024-01-09T13:39:35+5:30

दोन्ही आघाड्यांच्या पातळ्यांवर मात्र उमेदवार कोण याबाबतच कमालीचा संभ्रम

The candidate is not certain but the meetings are going strong for Lok Sabha in Kolhapur district | उमेदवारीचा घोर; बैठकांचा मात्र जोर, लोकसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हालचाली गतिमान 

उमेदवारीचा घोर; बैठकांचा मात्र जोर, लोकसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हालचाली गतिमान 

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणूका जाहीर होण्याचा कालावधी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. बैठका, भेटीगाठी, जाहीर कार्यक्रमांचा धडाका सुरू झाला आहे. दोन्ही आघाड्यांच्या पातळ्यांवर मात्र उमेदवार कोण याबाबतच मुख्यत: कमालीचा संभ्रम आहे. 

महायुतीचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना भाजपकडूनच पर्याय शोधला जात असल्याची हवा जास्तच जोर धरू लागली आहे. त्यामुळे शिंदे गटासह भाजपमध्येही सारेच काय होईल सांगता येत नाही अशा पवित्र्यात आहेत.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ दिल्यानेच राज्यात सत्ताबदल झाला हे खरे आहे. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांसमवेत गेलेल्या खासदारांची उमेदवारी बदलली जाणार नाही, असा दावा शिंदे शिवसेनेतून केला जात आहे. परंतु, भाजपच्या सर्व्हेमध्ये दोन्ही खासदारांबद्दल नकारात्मक चित्र असल्याचे वारंवार सांगण्यात येते.
  • दुसरे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या कोणत्याच नेत्याकडून आम्ही शिंदे गटाचे जे १३ खासदार आहेत त्या जागा त्यांच्याकडेच राहणार याबद्दल ठामपणे कोणी सांगायला तयार नाही. परिणामी उमेदवार बदलाच्या हवेला जोर मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच सोमवारी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी इचलकरंजीत येऊन खासदार माने यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे जाहीर करून टाकले.
  • भाजपला राज्याच्या सत्तेपेक्षा या घडीला लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार बदलायचे झाल्यास संभाव्य नावे म्हणून कोल्हापुरातून खासदार धनंजय महाडिक यांचे नाव वारंवार पुढे येत आहे. आता त्या जोडीला समरजित घाटगे यांचेही नाव चर्चेत येऊ लागले आहे. घाटगे यांनी कागलची विधानसभाच लढवायची हे पक्के केले आहे, परंतु तरीही जिल्हाध्यक्ष म्हणून सगळीकडे निर्माण झालेली ओळख, शाहू कारखान्यामुळे तयार झालेली प्रतिमा, उच्चशिक्षण आणि राजघराण्याची पार्श्वभूमी म्हणून त्यांचेही नाव चर्चेत असल्याचे भाजपच्याच गोटातून सांगण्यात आले.
  • इचलकरंजीतून राहुल आवाडे हे गेली दोन-तीन महिन्यांपासून बूथपर्यंतचे प्लॅनिंग करू लागले आहेत. त्यांनाही आपल्याला नेतृत्वाकडून न्याय मिळेल असे वाटते, परंतु ते अजून भाजपमध्येच नाहीत आणि उमेदवारी कशी मिळेल असाही प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
  • महाविकास आघाडीचा उमेदवार तिथे अनिश्चितच आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी ही जागा सोडली जाऊ शकते. महाविकास आघाडीच्या दृष्टीने आता भाजपची एकेक जागा कमी करणे हे ध्येय आहे, तिथे निवडून कोण येणार हा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही.
  • कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवारीसंबंधी सोमवारीच मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी प्रमुख कार्यकर्त्यांनी केली. त्या जागेवर जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील लढायला तयार असल्याचे जाहीर करण्यात आले.
  • शिवसेना ठाकरे गटाकडून चेतन नरके यांनीही साऱ्या शहरभर चैतन्यदायी कर्तृत्व हवं... अशी कॅचलाइन घेऊन फलक लावले आहेत. पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आज मंगळवारी कोल्हापुरात येणार असून त्यांच्या स्वागताचे फलकही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपेक्षा त्यांनीच जास्त लावले आहेत. कोल्हापूरची जागा काही झाली तरी शिवसेना आपल्याकडेच घेणार असून तुम्ही तयारीला लागा, असा मेसेज आपल्याला स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दिल्याचा दावा ते करत आहेत.
  • काँग्रेसकडून उमेदवारांचा घोळ अर्ज प्रक्रिया सुरू होईपर्यंत सुरू राहील अशी चिन्हे आहेत. अजूनही महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे मागून घेणे व मग त्यासाठी उमेदवार अशा दोन लढाया त्यांना लढायच्या आहेत. या पक्षाकडून संजय घाटगे यांच्या बरोबरीने आता संभाजीराजे यांचेही नाव चर्चेत आले आहे. आमदार सतेज पाटील यांची भूमिका यामध्ये निर्णायक असेल.

Web Title: The candidate is not certain but the meetings are going strong for Lok Sabha in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.