कोल्हापूरच्या अंबाबाईचा विशेष काळातील अन् दैनंदिन नैवेद्य काय?, कोणत्या कुटुंबाला आहे मान.. वाचा सविस्तर
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: September 25, 2025 12:40 IST2025-09-25T12:23:47+5:302025-09-25T12:40:15+5:30
काकड आरती ते शेजारतीपर्यंत विशेष पदार्थ

कोल्हापूरच्या अंबाबाईचा विशेष काळातील अन् दैनंदिन नैवेद्य काय?, कोणत्या कुटुंबाला आहे मान.. वाचा सविस्तर
इंदुमती गणेश
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या सकाळच्या आरतीपासून ते शेजारतीपर्यंत दिवसभरातील सर्व धार्मिक विधींमध्ये देवीला नैवेद्य करून देण्याचा मान प्रियांका प्रदीप बोंद्रे या सुगरणीला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळानंतर प्रधान यांनी गंगाआजींना हा मान दिला होता. त्यानंतर आता तिसरी पिढी देवीला प्रेमाचा घास करून देत आहेत.
छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळात अंबाबाईच्या दिनचर्येत पहाटेपासून ते शेजारतीपर्यंत प्रत्येकाला एक-एक जबाबदारी दिली. देवीला शाही लवाजमा दिला. जबाबदारी दिलेल्या प्रत्येकाने ही सेवा करायची, त्यात कोणताही खंड पडू नये असा हा नियम. गंगाआजी या मूळच्या देवरुखच्या, ज्यावेळी मंदिराची व्यवस्था प्रधान बघायचे तेव्हा त्यांनी गंगा बोंद्रे यांना अंबाबाईच्या नैवेद्याची जबाबदारी दिली.
त्यावेळी आजच्यासारखी सुबत्ता नव्हती. अशा काळात त्यांनी देवीचा नैवेद्य बनवायला सुरुवात केली. त्यांच्यानंतर सुधा बोंद्रे यांनी ही जबाबदारी अखेरपर्यंत निभावली. आता प्रियांका प्रदीप बोंद्रे या तिसऱ्या पिढीतील सूनबाई देवीसाठी प्रेमाचा घास बनवत आहेत.
मंदिर आवारातच घर..
देवीचा नैवेद्य बनवल्यानंतर तो गाभाऱ्यात आणेपर्यंत कुठेही शिवाशिव होऊ नये, त्याचे पावित्र्य राखले जावे यासाठी अंबाबाई मंदिर आवारातच नगारखान्याच्या खाली गंगाआजींना एक ओवरीची खाेली दिली गेली. मंदिर आवारात ते एकमेव घर आहे. तिथेच बोंद्रे कुटुंब राहतात. कोणतीही अडचण येऊ दे देवीच्या नित्य सेवेत खंड पडलेला नाही. आता प्रियांका यांच्या सून देखील या सेवेत आहे.
असा असतो नैवेद्य
- सकाळी ७ वाजता - लोणी खडीसाखर
- दुपारी बारा वाजता : पुरणपोळीचा नैवेद्य
- रात्री ८ वाजता : करंजा लाडू
- शेजारती : दूध, पानाचा विडा
विशेष काळातील पक्वान्न
- दिवाळी पाडवा : पंचपक्वान्नांचा नैवेद्य
- अक्षयतृतीया : पन्हं, डाळीची कोशिंबीर
- धनुर्मास (पौष) : महिनाभर रोज सकाळी साडे नऊ वाजता भाजी भाकरी त्यानंतर दुपारी १२ वाजता पुरणपोळीचा नैवेद्य.
एकूण पाच नैवेद्य
अंबाबाईसह आवारातील महाकाली, महासरस्वती, गणपती आणि मातृलिंग असे पाच नैवेद्य रोज केले जातात. त्यासाठी देवस्थान समितीकडून दर महिन्याला शिधा तसेच मानधन दिले जाते. पुरणपोळी, दोन भाज्या, वरण भात, पापड असा हा नैवेद्य असतो.