Kolhapur: लखन बेनाडेच्या मृतदेहाचा तीन दिवस शोधूनही थांगपत्ता नाही, हिरण्यकेशी नदी, यमगरणी परिसरात शोधमोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:36 IST2025-07-21T16:36:32+5:302025-07-21T16:36:55+5:30
आरोपींनी बेनाडे याचे दोन्ही हात आणि पाय धडापासून वेगळे केले. त्याची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावल्याचे सांगितले

Kolhapur: लखन बेनाडेच्या मृतदेहाचा तीन दिवस शोधूनही थांगपत्ता नाही, हिरण्यकेशी नदी, यमगरणी परिसरात शोधमोहीम
कोल्हापूर : रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे याचे अपहरण करून खून केल्यानंतर आरोपींनी कर्नाटकातील हिरण्यकेशी नदीसह यमगरणी परिसरात मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. पोलिसांकडून गेल्या तीन दिवसांपासून मृतदेहाचा शोध सुरू आहे. मात्र, मृतदेहाचे पाच तुकडे केल्याने अद्याप त्यातील एकही अवयव पोलिसांच्या हाती लागलेला नाही. नदीत वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि पावसामुळे शोधमोहिमेत अडथळे येत आहेत.
पूर्वीचा वाद आणि वारंवार पोलिस ठाण्यात तक्रारी देत असल्याच्या रागातून लखन बेनाडे याचे अपहरण करून पाच जणांनी त्याचा निर्घृण खून केल्याचे गुरुवारी (दि. १७) उघडकीस आले. अटकेतील संशयितांनी गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी कर्नाटकातील हिरण्यकेशी नदीत आणि यमगरणी गावाजवळ मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू केले होते. गेल्या तीन दिवसांपासून शोधमोहीम सुरू आहे. मात्र, अद्याप मृतदेह सापडलेला नाही.
आरोपींनी बेनाडे याचे दोन्ही हात आणि पाय धडापासून वेगळे केले. त्याची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र, यात अद्याप यश आलेले नाही. पावसामुळे हिरण्यकेशी नदीत पाणी वाढल्याने शोधमोहिमेत अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अटकेतील आरोपींना सोबत घेऊन पोलिसांनी यमगरणी येथे मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, मृतदेहाचा एकही तुकडा आढळला नाही. त्यामुळे आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
शाहूपुरीतील फिर्यादीनंतर वाद वाढला
पत्नीसह चार ते पाचजणांनी १२ तोळे दागिने आणि वेळोवेळी उसने घेतलेले पैसे परत न देऊन फसवणूक केल्याची फिर्याद बेनाडे यांनी गेल्या महिन्यात शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. राजकीय नेत्यांचा दबाव वापरून त्याने फिर्याद दाखल करून घेण्यास पोलिसांना भाग पाडले. त्या फिर्यादीनंतर बेनाडे आणि लक्ष्मी घस्ते यांच्यातील वाद आणखी वाढला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रील्समधून इशारा
लखन बेनाडे हा वारंवार रील्समधून लक्ष्मी हिला चिथावणी देत होता. लक्ष्मीनेही त्याला रील्समधून प्रतिउत्तर दिले होते. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमधील रील्सवॉर सुरू होते. अखेर लक्ष्मीने कट रचून साथीदारांसह लाखांचा गेम केला. या गुन्ह्यात वापरलेली कर विशाल घस्ते याची असून, ती पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच गुन्ह्यातील तलवार, एडका आणि चोपर पोलिसांनी जप्त केला.
मृतदेह शोधण्याचे आव्हान
हा गुन्हा न्यायालयात सिद्ध करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे, बेनाडे याची कपडे आणि गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे सापडणे आवश्यक आहे. यातील शस्त्रे मिळाली आहेत. मात्र, मृतदेहाचा अद्याप शोध लागलेला नाही. हिरण्यकेशी नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मृतदेह शोधण्यात अडचणी येत आहेत. यातच आरोपींकडून उलटसुलट माहिती मिळत असल्यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.