Kolhapur: २६ दिवसांनंतर मडिलगेतील युवक कर्नाटकात सापडला, वेदगंगा नदीत मारली होती उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:52 IST2025-07-19T16:50:13+5:302025-07-19T16:52:02+5:30
निपाणी पोलिसात नोंद

Kolhapur: २६ दिवसांनंतर मडिलगेतील युवक कर्नाटकात सापडला, वेदगंगा नदीत मारली होती उडी
गारगोटी : सव्वीस दिवसांपूर्वी (शनिवार २१ जून) मडिलगे बुद्रुक ता.भुदरगड येथे वेदगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केलेला अमित तानाजी रोकडे (वय २७ रा.देवकेवाडी,ता.भुदरगड) या युवकाचा मृतदेह कुन्नूर भोज (कर्नाटक) या ठिकाणी नदीपात्रातील पुलाजवळ सापडला. त्यामुळे गेले सव्वीस दिवस त्याचा शोध घेणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातीलपोलिसांनी निःश्वास सोडला.
२१ जून रोजी रात्री साडे आठच्या सुमारास गारगोटी कोल्हापूर मार्गावरील मडिलगे बुद्रुक येथील वेदगंगा नदीच्या पुलावरून अमितने नदी पात्रात उडी घेतली होती. अमित हा वेदगंगा नदीच्या पुलाच्या कठड्यावर पलीकडील बाजूस उभा होता. त्यावेळी तेथून चाललेल्या दोन युवकांना हा युवक लोखंडी संरक्षक कठड्याच्या पलीकडे उभा असलेला दिसला. दुचाकी वळवून त्यांनी त्याला विचारले असा का उभा राहिला आहेस? पण अमित रोकडे याने हातात असलेला मोबाइल रस्त्याकडील बाजूला टाकून जोरात आरोळी ठोकून सरळ पुराच्या पाण्यात उडी घेतली.
या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. उडी मारण्यापूर्वी अमितने भाचा सुरज वाईंगडे याला फोन केला होता. दरम्यान, अमित यांच्या फोनवर सुरज वाईंगडे याचा परत फोन आला. त्यावेळी त्या युवकाने तो फोन उचलून अमित याने नदीत उडी मारल्याचे सांगितले. अमित याला पोहता येत नव्हते. त्याचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन विभागाला पाचारण करावे लागले. त्यांनी तीन दिवस प्रयत्न केले, पण त्याचा मृतदेह सापडला नाही.
भुदरगड तालुक्यातील पोलिसांनी या घटनेची माहिती निपाणी, कागल, मुरगूड या पोलिसांना दिली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या प्रशासन यंत्रणांनी शोधकार्यात सहभाग घेतला. भुदरगड व कागल पोलिसांनी निपाणी पोलिसांच्या संपर्कात राहत शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. त्यामुळे अखेर मृतदेहाचा शोध लागला. आत्महत्या करण्यासाठी महाराष्ट्रातून नदीत उडी घेतली आणि मृतदेह कर्नाटकात सापडला.