कोल्हापुरात बँकेच्या मॅनेजरनेच घातला ग्राहकांना कोटीचा गंडा, आयसीआयसीआय बँकेतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:11 IST2025-01-28T13:10:44+5:302025-01-28T13:11:26+5:30
१२ ग्राहकांचे पैसे स्वत:च्या खात्यावर वळवले, मॅनेजर विकास माळी अटकेत

कोल्हापुरात बँकेच्या मॅनेजरनेच घातला ग्राहकांना कोटीचा गंडा, आयसीआयसीआय बँकेतील प्रकार
उद्धव गोडसे
कोल्हापूर : आयसीआयसीआय बँकेच्या क्रशर चौक आणि शिरोली एमआयडीसी शाखेतील मॅनेजर विकास आण्णाप्पा माळी (वय ३८, सध्या रा. जरगनगर, कोल्हापूर मूळ रा. केंपवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) याने १२ ग्राहकांसह बँकेला कोटीचा गंडा घातला. मुदत ठेव आणि मॅच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ती रक्कम चार मित्रांच्या खात्यावर वर्ग केली.
याप्रकरणी फिर्याद दाखल होताच जुना राजवाडा पोलिसांनी माळी याला सोमवारी (दि. २७) रात्री अटक केली. नामांकित बँकेच्या ब्रँच मॅनेजरनेच ग्राहकांना गंडा घातल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी गजानन सदाशिव गायकवाड (वय ४४, रा. कुपवाड रोड, सांगली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास माळी हा जुलै २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधित आयसीआयसीआय बँकेच्या शिरोली एमआयडीसी आणि क्रशर चौकातील शाखेत मॅनेजर पदावर कार्यरत होता. त्याने काही ग्राहकांना मुदत ठेव आणि मॅच्युअल फंडातून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार १२ ग्राहकांचे ९६ लाख ६० हजार १८ रुपये त्याने चार मित्रांच्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतर ती रक्कम स्वत:च्या बँक खात्यावर वर्ग केली. पुढे ते पैसे झेरोधा ब्रोकिंगमध्ये स्वत:च्या आयडीवर गुंतवले. याचा कोणताही लाभ ग्राहकांना दिला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही ग्राहकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार केली. त्यानंतर बँकेने केलेल्या चौकशीत माळी याने १२ ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विश्वासाने खात्यावर ठेवलेले पैसे बँक मॅनेजरनेच लंपास केल्याने ग्राहकांना धक्का बसला.
यांची झाली फसवणूक
तेजोमय हॉस्पिटल - डॉ. महेश दळवी (४८ लाख), स्नेहा भोसले (१७ लाख ५० हजार), श्रद्धा भोसले (५ लाख), मानवेंद्रनाथ जोशी ( ७ लाख ५० हजार), प्रकाश जगदाळे (५ लाख), आरती भावे (४ लाख), रवी गुड्स ट्रान्सपोर्ट-रवींद्र भावे (दीड लाख), उद्धव इंगळे (३ लाख १० हजार १८), गजानन सावंत (१ लाख), विशाल सोनवणे (१ लाख), संतोष पठारे (५० हजार), न्यूमॅटिक सेल्स अँड प्रा. लि. सर्व्हिसेस-नितीन शिंदे (अडीच लाख)