Kolhapur: ‘गोकुळ’चे संकलन वाढले, वासाचे, दुय्यम प्रतीचे दूध कमी झाले; प्रतिदिनी किती झाली वाढ...वाचा
By राजाराम लोंढे | Updated: November 24, 2025 15:52 IST2025-11-24T15:52:29+5:302025-11-24T15:52:47+5:30
पशुखाद्यासह कृती कार्यक्रमाचे फलित

Kolhapur: ‘गोकुळ’चे संकलन वाढले, वासाचे, दुय्यम प्रतीचे दूध कमी झाले; प्रतिदिनी किती झाली वाढ...वाचा
राजाराम लोंढे
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या दूध संकलनात झपाट्याने वाढ होत असतानाच वासाचे व दुय्यम प्रतीच्या दुधाचे प्रमाण कमी होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात ८ लाख ४४ हजार ६७२ लिटरने दुय्यम प्रतीचे तर ४ हजार ४३१ लिटर वासाचे दूध कमी झाले आहे. संघाच्या फर्टिमिन्स प्लस पशुखाद्याबरोबरच कृती कार्यक्रमाचे हे फलित मानले जात आहे.
दूध हे नाशवंत असल्याने ते काढल्यानंतर ठराविक वेळेतच त्याच्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असते. ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत वासाच्या दुधाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी रान तापवून सत्तांतर घडवले होते. जनावरांच्या गाेठ्यापासूनच चांगल्या प्रतीचे दूध कसे येईल, यासाठी गेल्या साडेचार वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.
मध्यंतरी तीन-चार महिने फर्टिमिन्स प्लस हे मोफत दिले. यामुळे जनावर सदृढ राहते, दूध उत्पादन वाढतेच, त्याचबरोबर दुधाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्याचे परिणाम सध्या दिसत असून, ऑक्टोबर २०२४ व २०२५ मधील दूध उत्पादन, वासाचे दूध आणि दुय्यम प्रतीच्या दुधाची तुलना पाहता, यामध्ये दुधाचे उत्पादन वाढले, पण वासाचे आणि दुय्यम प्रतीच्या दुधात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसते.
प्रतिदिनी दूध संकलनात ५५ हजार लिटरची वाढ
ऑक्टोबर २०२४ च्या तुलनेत ऑक्टोबर २०२५ या महिन्यात एकूण दूध संकलनात १७ लाख ५ हजार लिटर्सने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये म्हैस दूध तब्बल १३ लाख ८३ हजार ६०९ लिटर्सने वाढले आहे.
तुलनात्मक आकडेवारी..
दूध - ऑक्टोबर २०२४ चे संकलन (लिटर) - ऑक्टोबर २०२५ चे संकलन (लिटर)
- म्हैस - २,१९,८९,३६८ - २,३३,७२,९७७
- गाय - २,६६,०२,६९० - २,६९,२४,८०५
वासाचे व दुय्यम प्रतीचे दूध (लिटरमध्ये) :
दूध - ऑक्टोबर २०२४ - ऑक्टोबर २०२५
- वासाचे - ३२,१२० - २६,६८९
- दुय्यम प्रतीचे - ५३,७२,८८७ - ४५,२८,२१५
दुय्यम प्रत, वासाचे दूध निघूच नये, यासाठी विशेष कृती कार्यक्रम सुपरवायझरना दिला होता. त्यानुसार दुय्यम प्रतीच्या दुधाचे सेंटर शोधून तेथील दूध उत्पादकांचे प्रबोधन केले. त्यात मध्यंतरी मोफत फर्टिमिन्स प्लसचे वाटप केले. त्याचबरोबर हिरव्या चाऱ्याऐवजी ‘टीएमआर’चा वापर वाढला. त्याचा एकत्रित चांगला परिणाम दिसत आहे. - डॉ. योगेश गोडबोले (कार्यकारी संचालक, गोकुळ)