Kolhapur: डिजिटल फलक फाडल्याने हेरलेत तणाव, बेमुदत गाव बंदची हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 14:03 IST2023-04-25T14:03:02+5:302023-04-25T14:03:22+5:30
मिरवणूक दरम्यान लाईट गेली. दरम्यानच डिजिटल फलक फाडल्याचे काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले.

Kolhapur: डिजिटल फलक फाडल्याने हेरलेत तणाव, बेमुदत गाव बंदची हाक
सुरज पाटील
हेरले: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उभा केलेला डिजिटल फलक अज्ञात व्यक्तीने रात्री फाडल्याने हेरले (ता. हातकणंगले) गावात तणाव निर्माण झाला. महिला आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज, मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत माळभागावरील संजय नगर मधील बेकायदेशीर मशिद तात्काळ पाडण्यात यावी अशी मागणी केली.
हेरले येथील माळभागावरील संजय नगरमध्ये परिसरातील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छाचा फलक लावला होता. फलक लावत असताना त्या ठिकाणच्या एका मुस्लिम कुटुंबांने फलक लावण्याला विरोध केला होता. फलक काढून टाकण्याची धमकी दिली होती. विनाकारण वाद होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी फलकाची जागा बदलली होती. तर, काल, सोमवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक दरम्यान लाईट गेली. दरम्यानच डिजिटल फलक फाडल्याचे काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस फौज फाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना परत पाठवून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सांगितले. याबाबत कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पण गावात रात्रभर तणाव निर्माण झाल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह महिलांनी मोठ्या संख्येने ग्रामपंचायतवर धडक दिली. यावेळी बेकायदेशीर मशीद पाडण्यात यावी तसेच यावरही त्वरित कारवाई करावी असे आवाहन करत बेमुदत गाव बंदची हाक दिली.