Teachers should implement an old pension scheme: | शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी: शिक्षकांचे धरणे आंदोलन

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी: शिक्षकांचे धरणे आंदोलन

ठळक मुद्देशिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी मुख्याध्यापक संघ, राज्य शाळा कृती समितीतर्फे शिक्षकांचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शिक्षक ज्यांची नियुक्ती १ नोव्हेंबर २००५ पूर्वी झाली आहे, त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ ते ४ या वेळेत हे धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, कोषाध्यक्ष एम. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला.

सुरेश संकपाळ म्हणाले, महाराष्ट्र नागरी सेवा शर्थी १९८२ कलम ४ नुसार जुनी पेन्शन योजना देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेस पात्र ठरतात. आगामी काळात काही कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना पेन्शन योजना लागू करावी.

दरम्यान, याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून १५०० जण जुनी पेन्शन योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यभरातील ६० हजारांहून अधिक शिक्षक, कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेसाठी संघर्ष सुरू आहे.

याप्रश्नी शिक्षकांनी कायदेशीर लढाई सुरू केली आहे. या सेवकांच्या नेमणुकीस शिक्षण खात्याची मान्यता आहे. ते शिक्षक काम करीत असलेल्या शाळा तसेच तुकड्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. त्यांची भविष्य निर्वाह निधीतून कपात सुरू आहे. तेव्हा सरकारने त्यांना जुनी पेन्शन योजना द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

आंदोलनात अजित रणदिवे, अशोक उबाळे, दीपक पाटील, मिलिंद पांगिरेकर, एस. आर. पाटील, पोपट पाटील, श्रीकांत पाटील, राजश्री चौगुले, आदींसह शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

यांनी दिला पाठिंबा

आंदोलनस्थळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, शिक्षक संघटनेचे नेते दादा लाड, संस्थाचालक संघटनेचे वसंतराव देशमुख, जयंत आसगांवकर, शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन व्ही. जी. पोवार, आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला.
 

 

Web Title: Teachers should implement an old pension scheme:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.