शिक्षकांचाही 'मदती'चा तास; पूरग्रस्तांचे दुखः हलके करण्यासाठी सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 16:06 IST2019-08-09T16:05:06+5:302019-08-09T16:06:36+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शिक्षकांनी मदतीसाठी आवाहन केले आहे.

शिक्षकांचाही 'मदती'चा तास; पूरग्रस्तांचे दुखः हलके करण्यासाठी सरसावले
प्रदीप शिंदे, कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाचव्या दिवशीही महापुराचा धोका कायम आहे. पुराचे पाणी वेगानं वाढत असताना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र राबत आहे, त्यांची मर्यादा लक्षात घेऊन सामाजिक संस्था, सामान्य नागरिक, तरूण ही मदतीला धावून आले असून यांच्यासह शिक्षकही मदतीसाठी सरसावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शिक्षकांनी मदतीसाठी आवाहन केले आहे.दोन लाख रूपये, दहा लांखाची वस्तू स्वरूपात मदत शिक्षकांच्याकडून मिळाली आहे.
क्षणा क्षणाला वाढणारी पाणी पातळी. प्रापंचिक साहित्य पाण्यात तरंगतंय, लाईट नाही, पिण्याचे पाणी संपलेले. इतर मोबाईलची बॅटरीही संपले त्यामुळे संपर्क ही तुटलेला अशा परिस्थितीत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही गावांत पूरग्रस्तांची परिस्थिती आहे.
नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. शहरातील मंगल कार्यालये, शाळा पूरग्रस्तांसाठी खुल्या करण्यात आल्या असून, तेथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेली आठ दिवस पाऊस काही कमी येईना पाणी पातळी संथ गतीने कमी होत असल्याने पूरग्रस्तांची स्थिती बिकट झाली आहे.
पूरपरिस्थिती बिकट होत चाली आहे. आम्ही शिक्षक चळवळ या सोशल मीडियांच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवत आहे. एक दिवसात रोख दोन लांख रुपये, दहा लांखाचे वस्तू रूपात मदत मिळाली, असे जेष्ठ शिक्षक भरत रसाळे यांनी सांगितले.
पूरग्रस्तांना मदतीसाठी प्राथमिक शिक्षण समिती, कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत मनपा शाळा व प्राथमिक शाळा शिक्षक, सेवक व प्राथमिक शिक्षण समिती अधिकारी, कर्मचारी यांची मदत सुरू केली आहे.
बागल चौकातील डायट कार्यालय बी टी कॉलेज येथे या साहित्यांचे वर्गीकरण करण्यात येत आहे.
वस्तू स्वरूपात
कोरडे कपडे, अंथरून, टॉवेल्स,कोरडा खाऊ, टूथपेस्ट, टोथब्रश, साबण, तेल, सॅनिटरी नॅपकिन, डायपर, मेणबत्ती
माचीस,बादली इत्यादी विविध स्वरूपात साहित्य संकलन सुरू केले आहे.
काही तासांमध्ये मदतीचा ओघ...
शिक्षकांनी सोशल मीडियांच्या माध्यमातून पूरग्रस्तासाठी मदतीचे अहवान केले. आणि अवघ्या काही तासामध्ये मदतीचा ओघ सुरू झाला. याठिकाणी या वस्तूचे वर्गीकरण करण्यात येत आहे.
संघटनेतील हवेदावे बाजूला
शिक्षक संघटना आपल्यामधील हवेदावे विसरून मदतीसाठी एक झाले आहेत. प्रत्येक जण आपल्या पध्दतीने नियोजन करत आहे.