Kolhapur: पुस्तक देण्यासाठी घरी आलेल्या मुलीचा विनयभंग केला; शिक्षकास तीन वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:42 IST2025-04-24T12:41:57+5:302025-04-24T12:42:19+5:30
घरात मोबाइलवर बघत होता अश्लील चित्रफिती

Kolhapur: पुस्तक देण्यासाठी घरी आलेल्या मुलीचा विनयभंग केला; शिक्षकास तीन वर्षे सक्तमजुरी
कोल्हापूर : दहावीचे पुस्तक देण्यासाठी घरी आलेल्या मुलीचा विनयभंग करणारा शिक्षक महेश नारायण नाजरे (वय ५८, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) पी. एफ. सय्यद यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बुधवारी (दि. २३) या खटल्याचा निकाल लागला. ९ फेब्रुवारी २०१९ मध्ये दुपारी सव्वाबाराच्या सुमारास नाजरे याच्या घरात हा गुन्हा घडला होता.
सरकारी वकील ॲड. मंजूषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश नाजरे हा शिक्षक असून, गुन्हा घडलेल्या दिवशी तो पीडित मुलीच्या घरी दहावीचे इतिहासाचे पुस्तक आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी मुलीच्या आईने पुस्तकाच्या झेरॉक्स काढून त्या नाजरे यांच्या घरी पोहोच करण्यास मुलीला सांगितले. त्यानुसार दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मुलगी पुस्तकाच्या झेरॉक्स घेऊन नाजरे याच्या घरी गेली.
घरात मोबाइलवर बघत होता अश्लील चित्रफिती
त्यावेळी तो घरात मोबाइलवर अश्लील चित्रफिती बघत होता. घरात दुसरे कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीशी अश्लील चाळे केले. तिला आतल्या खोलीत ओढून नेताना हिसडा देऊन पीडित मुलगी घरी पळून गेली. हा प्रकार घरात सांगताच तिच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी तपास करून नाजरे याच्यावर आरोपपत्र दाखल केले. ॲड. मंजूषा पाटील यांनी न्यायाधीशांसमोर ९ साक्षीदार तपासले. पीडित मुलीची आई, वडील, कॉलनीतील शेजारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सर्व साक्षी, पुरावे आणि ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सय्यद यांनी नाजरे यास दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
पॉक्सोंतर्गत शिक्षा
न्यायाधीशांनी आरोपी नाजरे याला बाललैंगिक प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉक्सोंतर्गत कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड आणि कलम १२ नुसार १ वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.