Kolhapur: चुकीची फेरफार दुरूस्तीसाठी तलाठ्याने मागितले १० हजार, लाचलुचपत'ने रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:58 IST2026-03-19T11:58:29+5:302026-03-19T11:58:57+5:30
याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

Kolhapur: चुकीची फेरफार दुरूस्तीसाठी तलाठ्याने मागितले १० हजार, लाचलुचपत'ने रंगेहाथ पकडले
कोडोली : सातवे (ता. पन्हाळा) येथील चुकीची फेरफार नोंदीच्या दुरूस्तीसाठी दहा हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी तलाठी हणमंत शंकर बदडे ( रा. कसबा बावडा) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातवे येथील विक्री केलेल्या प्लॉटचे क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र खरेदी दस्तावर नोंदणी झाली होती. त्यामुळे चुकीचे फेरफार नोंदीच्या दुरूस्ती करीता तक्रारदाराने अर्ज केला होता. अर्जाप्रमाणे दुरूस्ती करण्यासाठी तलाठी बदडे यांनी दहा हजार रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी चार हजार रूपये स्वीकारले होते.
उर्वरित ६ हजारासाठी बदडे याने तक्रारदाराकडे तगादा लावला होता. याप्रकरणी लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील प्रशांत दावणे यांनी काम पाहिले.