Kolhapur Crime: पत्नीला माहेरी आणल्याच्या रागातून सासूवर तलवार हल्ला, जावयावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:07 IST2025-03-06T17:06:51+5:302025-03-06T17:07:12+5:30
गोकुळ शिरगाव : येथे कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. नीलेश कृष्णात तोरस्कर (वय ...

Kolhapur Crime: पत्नीला माहेरी आणल्याच्या रागातून सासूवर तलवार हल्ला, जावयावर गुन्हा दाखल
गोकुळ शिरगाव : येथे कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. नीलेश कृष्णात तोरस्कर (वय ४०) असे संशयित आरोपीचे नाव असून, मालन शामराव पाटील (६२) असे जखमी सासूचे नाव आहे.
मालन पाटील या आपल्या घराच्या दारात बसलेल्या असताना पत्नीला माहेरी आणल्याच्या रागातून नीलेशने त्यांच्यावर तलवारीने वार केले. या हल्ल्यात मालन पाटील डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर नीलेश तोरस्कर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
संशयित आरोपी नीलेश तोरस्कर याचे पत्नी राधिकासाेबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. राधिकाला नीलेश त्रास देत असल्यामुळे तिचा भाऊ दत्तात्रय पाटील यांनी तिला महिन्यापूर्वी माहेरी आणले होते. याचा राग नीलेशच्या डोक्यात होता. दत्तात्रय यांनी नीलेशला सांगितले की, त्याच्या मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर ते राधिकाला नांदायला पाठवतील. पण नीलेश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ताे दत्तात्रय आणि त्यांच्या आईला जिवे मारण्याची सतत धमकी देत होता.
मंगळवारी रात्री ९:१५ च्या सुमारास नीलेशने मालन पाटील यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यात मालन पाटील गंभीर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. फरार नीलेशचा शोध सुरू असून सपोनि टी. जे. मगदूम या प्रकरणाचा तपास करीत आहेत.