Kolhapur: गुरुजींच्या बोगस प्रमाणपत्रांमुळे सीपीआरमधील डॉक्टरांवर संशय
By समीर देशपांडे | Updated: October 31, 2025 17:41 IST2025-10-31T17:41:18+5:302025-10-31T17:41:38+5:30
नव्या अधीष्ठांतासमोर सोक्षमोक्ष लावण्याचे आव्हान

Kolhapur: गुरुजींच्या बोगस प्रमाणपत्रांमुळे सीपीआरमधील डॉक्टरांवर संशय
समीर देशपांडे
कोल्हापूर : शिष्यवृत्ती निकालापासून परखच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात राज्यात विद्यार्थ्यांना अव्वल आणणाऱ्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांकडे बोट दाखविण्याची संधी २६ शिक्षकांनी उपलब्ध करून दिली आहे. सोयीच्या बदलीसाठी दिव्यांग आणि आजारपणाची सदोष प्रमाणपत्रे सादर करण्यात आली असून, यातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, विषय एवढ्यावरच थांबत नाही. यातील अनेक प्रमाणपत्रे ही सीपीआर रुग्णालयातून देण्यात आली आहेत. परिणामी आता सीपीआरमधील डॉक्टरांच्या भोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची आता जिल्हाभर चर्चा सुरू झाली असून, केवळ साेयीच्या बदलीसाठी बोगस प्रमाणपत्रे घेण्याचे धाडस कोणाच्या जिवावर शिक्षकांनी केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामविकास विभागाच्या १८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा राबविण्यात आली.
संवर्ग १ मधील बदल्यांपासून ही प्रक्रिया सुरू झाली आणि यातून बदल्या करून घेणाऱ्या अनेकांनी आजारांची आणि दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमध्ये सूट मिळविल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या. याची दखल घेत १६ जून २०२५ च्या शासन आदेशानुसार संवर्ग शिक्षक भाग १ बाबत या प्रमाणपत्रांबाबत खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले.
सीपीआरच्या डॉक्टरांची चौकशी आवश्यक
३५६ पैकी २६ शिक्षकांची प्रमाणपत्रे सदोष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यातील नेमकी किती दिव्यांग आणि आजारपणाची प्रमाणपत्रे सीपीआरने दिली आहेत याचा तपास होण्याची गरज आहे. बोगस प्रमाणपत्रांबद्दल संबंधित शिक्षकांच्या निलंबनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यातील चौघांना आधीच निलंबित करण्यात आले आहे. परंतु, खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्या डॉक्टरांनाही त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्याच जिल्ह्यात दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या डॉक्टरांविरोधात नवे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे हे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.
चौघांचे मृत्यू दाखले मागविले
सीपीआरकडून आलेल्या अहवालात दोन शिक्षक आणि दोन शिक्षकांच्या जोडीदारांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील दोन शिक्षक हे आजरा तालुक्यातून असून, ज्यांच्या जोडीदारांचा मृत्यू झाला आहे त्यातील एक राधानगरी तालुक्यातील, तर एक करवीर तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका आहे. या चौघांचे मृत्यू दाखले जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मागविले आहेत.