बिबट्याशी झुंजलेल्या पोलिसांना बक्षीस, जखमींना मानसिक धक्का; नेमका आला कोठून...कोल्हापूरकरांना गूढ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:26 IST2025-11-13T17:23:55+5:302025-11-13T17:26:43+5:30
जखमींच्या प्रकृतीत सुधारणा

बिबट्याशी झुंजलेल्या पोलिसांना बक्षीस, जखमींना मानसिक धक्का; नेमका आला कोठून...कोल्हापूरकरांना गूढ!
कोल्हापूर : स्वत:चा जीव धोक्यात घालून बिबट्याशी झुंझलेल्या पोलिसांना अधीक्षक योगेश कुमार यांनी बुधवारी (दि. १२) बक्षीस जाहीर केले. रोख रकमेसह प्रमाणपत्र देऊन लढवय्या पोलिसांचा सन्मान केला जाणार आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, त्यातील दोघांवर अजूनही सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. कोल्हापूर शहरात बिबट्या नेमका कुठून अन् कोणत्या मार्गाने आला यांची चर्चा सुरु होती.
ताराबाई पार्क परिसरात बिबट्या आल्याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके हे त्यांच्या अन्य चार कर्मचाऱ्यांसह तातडीने वुडलँड हॉटेल परिसरात पोहोचले. बिबट्याचा शोध घेत असतानाच त्यांच्या पथकातील कॉन्स्टेबल कृष्णात पाटील यांच्यावर बिबट्याकडून हल्ला झाला.
पोलिसांनी धाडसाने बिबट्याचा हल्ला परतवून लावत त्याला लपण्यासाठी जागा शोधण्यास भाग पाडले. दरम्यान, निरीक्षक डोके यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना तातडीने माहिती देऊन बोलावून घेतले. प्रसंगावधान राखून बिबट्याला जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल निरीक्षक डोके, कॉन्स्टेबल कृष्णात पाटील यांच्यासह पाच पोलिसांना विशेष बक्षीस देण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे. त्याचा अहवाल त्यांनी बुधवारी तातडीने शाहूपुरी पोलिसांकडून मागवून घेतला. लवकरच या धाडशी पोलिसांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
जखमींना मानसिक धक्का
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले कॉन्स्टेबल पाटील, बागकाम करणारे तुकाराम सिद्धू खोंदल (रा. भोसले पार्क, कदमवाडी), बाळू अंबाजी हुंबे आणि वनकर्मचारी ओंकार काटकर या सर्वांनाच मानसिक धक्का बसला होता. या चौघांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली असून, पाटील आणि खोंदल यांच्यावर अजूनही सीपीआरमध्ये उपचार सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याने डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांकडून साधनसज्जता
जिल्ह्यात बिबट्यासह गवा आणि हत्तींचा उपद्रव वाढत आहे. जंगली प्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना घडताच सर्वप्रथम पोलिसांना घटनास्थळी पोहोचावे लागते. अशावेळी कोणती खबरदारी घ्यावी? प्राण्यांना पकडण्यासाठी किंवा हुसकावून लागण्यासाठी काय करावे? याचे प्रशिक्षण पोलिसांनाही दिले जाणार आहे तसेच प्राण्यांना पकडण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी केले जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.
यांना बक्षीस
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह हवालदार चंद्रशेखर लंबे, कॉन्स्टेबल कृष्णात पाटील, सरदार दिंडे, इंद्रजित भोसले यांना बक्षीस मिळणार आहे.